जळगाव (प्रतिनिधी) ४० लाख रूपयांची वसुली करण्यासाठी जळगावातील बिल्डरच्या अपहरणाची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, रामानंदनगर पोलिसांनी अतिशय नाट्यमय घटनेत या व्यक्तीसह त्याच्या दोन सहकार्यांची सुटका केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले आहे.
यासंदर्भात अधिक असे की, बायोडिझेलच्या विक्रीसह खरेदीच्या व्यवहारापोटी दिलेले व्याजासह एकूण ४० लाख रुपये परत दिले नाही म्हणून मयूर वसंत सोनवणे उर्फ मयूर महाजन (वय ३५ रा. जिजाऊ नगर, जळगाव) या बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करून त्याला धाक दाखवण्यासाठी सात आठ जणांना सुपारी दिली. यानुसार सुपारी घेतलेल्यांनी पैशांसाठी मयूर महाजन यांच्यासह त्याच्या दोन्ही चालकांना नाशिक, संगमनेर, अजिंठा अशा वेगवेगळ्या ठिकाणी डांबून ठेवत बंदुकीच्या गोळयांसह वेगवेगळ्या प्रकारे जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यादरम्यान बांधकाम व्यावसायिक मयूर महाजन यांनी पैसे मागविण्याच्या बहाण्याने मोबाईलवरून पत्नीसह बहिणीला लोकेशन पाठविले. त्यानुसार प्रकरण पोलिसात पोहचल्यावर रामानंदनगर पोलिसांनी सिनेस्टाईल घडलेल्या या प्रकरणाचा पर्दाफाश केला असून बांधकाम व्यावसायिक महाजन यांच्यासह त्यांच्या चालकांची सुटका करून आठ जणांना ताब्यात घेतले आहे.
ओळखीतून बायोडिझेलचा व्यवहार झाला होता
यासंदर्भात मयूर वसंत महाजन यांनी रामानंदनगर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. यानुसार, जिजाऊ नगरातील मयूर सोनवणे उर्फ महाजन यांची नाशिक येथे संस्कार एंटरप्रायजेस नावाची फर्म आहे. चार महिन्यांपूर्वी महाजन हे बायोडिझेल होलसेल विक्रीचा व्यवसाय करत होते. यादरम्यान त्यांची मलिक नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली. ओळखीतून मलीक याच्यासोबत महाजन यांचा बायोडिझेलचा व्यवहार झाला होता. या व्यवहारापोटील मलिक याने महाजन यांना ८० लाख रुपये दिले होते. त्यापैकी ठरल्या व्यवहाराप्रमाणे महाजन यांनी मलिक याला ७८ लाख रुपये किंमतीचे चार टँकर बायोडिझेल पुरविले होते. दोन लाख रुपये बाकी असतांना, मलीक याने फोन करून महाजन यांना १८ लाख रुपये बाकी असल्याचे सांगितले. तसेच व्याजासह ही रक्कम ४० लाख रुपये असून ती रक्कम परत करण्याचे महाजन यांना सांगितले. दरम्यान, कोरोना असल्याने व्यवहार बंद असल्यामुळे मयूर महाजन यांना मलिक याची उर्वरीत रक्कम परत करता आली नाही. यातून मलिक याने महाजनांची सुपारी दिली.
किडनॅप करून मारहाण करण्याची धमकी
१२ जानेवारी रोजी मयुर महाजन हे त्यांच्या दोन्ही चालकांसह त्यांच्या एम.एच१९ ए.एफ.८०५५ या क्रमाकांच्या चारचाकीने प्रभात चौकात गेले होते. यादरम्यान एका ठिकाणी गाडी उभी करुन थांबलेले असतांना, शेख बिलाल गुलाम याचा महाजन यांना फोन आला. बायोडिझेलची नोझल मशीनची ऑर्डर द्यावयाची असून ती घेण्यासाठी तुमच्या मित्राकडे नाशिकला जावयाचे असल्याने संबंधिताने महाजन यांना सांगितले. महाजन यांनी होकार दिल्यावर शेख गुलाम याने त्याच्या गाडीत महाजन यांना बसविले. त्यांच्या मागे महाजन यांचे दोन्ही चालक त्यांची गाडी घेवून येत होते. नाशिकला पोहचल्यावर याठिकाणी एका ऑफिसात घेवून जात याठिकाणी सात ते आठ जणांनी महाजन व त्यांचे चालकांचे मोबाईल हिसकावून घेतले. यावेळी महाजन यांनी नेमका काय प्रकार सुरु आहे, याबाबत विचारले असता मलिक याने आम्हाला सुपारी दिली असून त्याचे ४० लाख रुपये देवून टाक नाहीतर तुला जळगावला घेवून जावून व बंदुकीच्या गोळ्या मारुन टाकू, सोडणार नाही अशी धमकी शेख गुलाम याने महाजनांना दिली.
लोकेशनवरुन पोलिसांनी तिघांची केली सुटका
सिल्लोड रोडने महाजन यांच्यासह त्यांच्या चालकांना घेवून जात असतांना महाजन यांनी संबंधितांना पैसे देण्याचे कबुल करून मोबाईल मागितला. यादरम्यान महाजन यांनी त्यांची पत्नी शमीका हिच्याशी बोलणे करून तिला मोबाईलवरुन लोकेशन पाठविले. तसेच महाजन यांनी त्यांची जळगावातील बहिण माधुरी चव्हाण हिला सुध्दा लोकेशन पाठविले. हा प्रकार महाजन यांनी संबंधितांना कळू दिला नाही. जळगावात लोकेशन तसेच महाजन यांच्यासोबत घडल्या प्रकाराबाबत महाजन यांची बहिणी माधुरी चव्हाण यांनी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. तक्रारीनुसार पोलिसांनी मयूर महाजन यांच्या मोबाईल लोकेशनवरुन सिल्लोड रोडवरील साईमिलन हॉटेल गाठले. येथे डांबून ठेवलेल्या महाजन यांच्यासह त्यांचे चालक विजय सुभाष इंगळे व सागर जीवन विसपूते या तिघांची पोलिसांनी सुटका केली.
आठ जणांना घेतले ताब्यात
रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळावरून पोलिसांनी अमजद दाऊद सैय्यद, शेख बिलाल गुलाम, मजाज दाऊद सैय्यद, अब्दुल नासिर गफ्फार, इम्रान इलियास शेख, अजीम अजीज शेख, शहानवाज वजीन खान, अबुकर सलीम मलीक या आठ जणांना ताब्यात घेतले. तर, दोन जण गाडीतून पसार झाले आहे. सुखरुप सुटका झाल्यानंतर मयूर महाजन यांनी घडल्याप्रकाराबाबत शनिवारी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.