पुणे (वृत्तसंस्था) भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पुणे दौऱ्यात शिवसेना कार्यकर्ते आणि सोमय्या यांच्यात झटापाट झाली. या झटापटीत किरीट सोमय्या जखमी झाले असून एक्सरे काढण्यासाठी आणि इतर तपासण्या करण्यासाठी त्यांना पुण्यातील संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोरोना काळात पुण्यात जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. परंतु, या कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. या भ्रष्टाचाराची तक्रार देण्यासाठी ते आज पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेले होते. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन पुणे महानगरपालिकेत आयुक्तांनाही यावेळी सिरीट सोमय्या तक्रार देणार होते. परंतु, यावेळी सोमय्या पुणे महापालिकेच्या इमारतीत प्रवेश करताना इमारतीत आधीपासूनच उपस्थित असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांना घेरले आणि झटापट झाली. त्यानंतर सोमय्या यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत सोमय्या पालिकेच्या पायऱ्यांवर पडले. त्यामध्ये ते जखमी झाले.
दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या विरोधात पुण्यातील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी सोमय्या यांची गाडी अडवून गाडीवर हाताने ठोसे मारले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पुणे महानगर पालिकेच्या इमारतीसमोर एकच गोंधळ उडाला. पुण्यातील जम्बो कोविड सेंटर चालवण्याचे कंत्राट लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीला देण्यात आलं होतं. कोविड सेंटर सुरू असताना त्यात अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. त्यासाठी हॉस्पिटलचे व्यवस्थापण कारणीभूत आहे असून लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्विसेसला या कामाचा अनुभव नसताना सेंटरचे कंत्राट देण्यात आले, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. या संदर्भात तक्रार देण्यासाठी किरीट सोमय्या आज पुण्यात गेले होते.
दरम्यान, आता किरीट सोमय्या यांच्या प्रकृतीबाबत संचेती रूग्णालयाच्या डॉ. पराग संचेती यांनी माहिती दिली आहे. “किरीट सोमय्यांच्या मनगटाला मार लागला आहे. घाबरल्यामुळे त्यांचा ब्लड प्रेशर वाढला होता. परंतु, आता त्यांचा ब्लड प्रेशर नॉर्मल झाला आहे. त्यांना फ्रॅक्चर झालेले नाही. मुक्का मार लागला आहे. त्यामुळे उद्या सकाळपर्यंत त्यांना संचेती रुग्णालयात निगराणीखाली ठेवण्यात येईल आणि त्यानंतर डिस्चार्ज देण्यात येईल, असे डॉ. पराग संचेती यांनी सांगितले.