शिरपूर (प्रतिनिधी) तालुक्यातील विखरण येथे अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या वडिलांना आरोपींनी चिथावणी देऊन चाकूने हल्ला करीत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याप्रकरणी तीन जणांविरोधात शिरपूर पोलिसांत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, शिरपूर तालुक्यातील विखरण येथील राकेश भीमराव चव्हाण यांच्या घरासमोर ही घटना घडली. चव्हाण यांच्या अल्पवयीन मुलीची छेड का काढतो असे विचारण्यास धनराज भाऊसाहेब साळुंखे (वय २५) याच्याकडे गेले असता त्याचा राग येऊन त्याने चाकू हल्ला केला. संशयित आरोपी धनराज हा पीडित मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिला पळवून घेऊन जाण्यासाठी तिचा पाठलाग करत असल्याने तिला लज्जा वाटल्याने तिने घडलेला प्रकार तिच्या आई-वडिलांना सांगितला.
त्यानंतर पीडिताचे आई-वडील व इतर साक्षीदार यांनी आरोपी धनराज यास जाब विचारला असता, तुमच्याकडून माझे काहीच होणार नाही तुमची मुलगी मी तुमच्या समोर पळवून घेऊन जाईन, अशी धमकी देत शिवीगाळ केली. त्याचा मोठा भाऊ चंद्रकांत भाऊसाहेब साळुंखे (वय २८) व आई विमलबाई भाऊसाहेब साळुंखे (वय ६०), सर्व रा. विखरण, ता. शिरपूर असे तिघांनी पीडिताच्या वडिलांना मारहाण केली, तसेच चिथावणी देत चाकूहल्ला करीत जिवंत ठेवणार नाही, असे बोलून चव्हाण यांना जखमी केले. याबाबत अल्पवयीन पीडित मुलीचे वडील राकेश चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन जणांविरोधात शिरपूर पोलिसांत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण बाहे तपास करीत आहेत.