दुबई (वृत्तसंस्था) आयसीसीने सोमवारी क्रिकेट पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली. भारतीय कर्णधार विराट कोहलीला ‘सर गारफिल्ड सोबर्स मेल क्रिकेटर ऑफ द डेकेड’ (२०११-२०२०) आणि ‘वन डे प्लेअर ऑफ द डेकेड’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीला स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड ऑफ द डेकेड पुरस्काराने गौरवण्यात आले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला दशकाचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवडले आहे. या दशकात तिन्ही स्वरूपात कोहलीच्या दमदार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने त्याला सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार म्हणजेच ‘सर्वश्रेष्ठ क्रिकेटर ऑफ द दशक’ने गौरव केला आहे. कोहलीने २०११ ते २०२० पर्यंत टेस्ट, वनडे आणि टी-२० त २० हजार ३९६ धावा केल्या. यादरम्यान त्याने ६६ शतके आणि ९४ अर्धशतके केली. कोहलीने यादरम्यान ७० डावात ५६.९७ च्या सरासरीने धावा केल्या. तो २०११ मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता. तर केवळ वनडेत कोहलीने या दशकात ६१.८३ च्या सरासरीने १० हजारांपेक्षा जास्त धावा काढल्या. या दरम्यान त्याने ३९ शकते आणि ४८ अर्धशतके केली. मागील १० वर्षांत वनडेत त्याने ११२ झेल टिपले. भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीला ‘ICC स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड’ ने सन्मानित केले. धोनीने २०११ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत इयान बेल धावबाद झाल्यानंतरही त्याला मैदानात परत बोलावले होते. चाहत्यांनी याच भावनेसाठी त्याला स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कारासाठी निवडले. आयसीसी पुरस्कारांच्या या कालावधीत कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. यासह त्याने या काळात सर्वाधिक शतके आणि सर्वाधिक अर्धशतकाही ठोकले आहेत. या दशकात कोहलीच्या फलंदाजीमध्ये २०,३९६ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ६६ शतके आणि ९४ अर्धशतकांचा समावेश होता.
यापूर्वी आयसीसीने कोहलीची निवड दशकातील सर्वश्रेष्ठ वनडे क्रिकेटपटू म्हणून केली होती. या दशकात, कोहली एकदिवसीय क्रिकेटमधील एकमेव खेळाडू आहे ज्याने १०,०००हून अधिक धावा केल्या आहेत. तर रविवारी आयसीसीने विराट कोहलीला या दशकाच्या तिन्ही फॉर्मेटच्या संघात स्थान दिले. त्याशिवाय आयसीसीने कोहलीला या दशकातील कसोटी संघाचा कर्णधारही बनवले.