मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईतून एक विचित्र घटना समोर आली आहे. पंतप्रधान मोदींचं रक्षण करणारा एसपीजी कमांडो खिशेकापूचा बळी ठरला. विलेपार्ले ते महालक्ष्मी या लोकलमधून प्रवास करत असताना, अज्ञातानं त्यांच्या खिशावर डल्ला मारला आहे. लोकलमधील भामट्यानं अत्यंत शिताफीनं पीएम मोंदीच्या सुरक्षा रक्षकाचं पाकीट लंपास केलं आहे. याबाबत त्यांनी अंधेरी पोलिसात तक्रार केली. त्यानंतर तपास करत पोलिसांनी चोराला अटक केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा कमांडोचे पाकीट मारल्याने पोलिसांनीही यंत्रणा कामाला लावली. आपल्या खबऱ्यांकडून माहिती घेत, काही दिवसांतच मुंबईच्या गर्दीतून लोकल चोराचा थांगपत्ता शोधला, अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली. सुभाष चंद्रा हे ७ नोव्हेंबर रोजी विलेपार्ले ते महालक्ष्मी असा प्रवास करत होते. त्यावेळी, चोरट्याने त्यांचे पाकिट चोरले होते. याप्रकरणी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या पाकिटातील वस्तूची माहिती घेत तपास केला. त्यामध्ये, सुभाष चंद्रा यांच्या डेविट आणि क्रेडीट कार्डमधून १९ हजार रुपयांचे ट्रान्झेक्शन झाल्याचे उघड झाले.
सुभाष चंद्रा यांच्या बँक खात्यातून वायफायद्वारे हे ट्रान्झॅक्शन करण्यात आले होते, त्यामुळे पोलिसांनी सायबर क्राईमच्या मदतीने आरोपी हेदर शमशुद्दीन यास अटक केली. मीरा रोड येथे तो राहत असून आयसीआयसीआय बँकेचे स्वाईप मशिन, पेटीम कार्डही त्याकडून जप्त करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी सांगितले.