जळगाव (प्रतिनिधी) भाजपाला जय श्रीराम केल्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोपडे मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात दंड थोपटण्याची शक्यता असतानाच या संदर्भात मंत्री गिरीश महाजन यांना माध्यमांनी छेडल्यानंतर त्यांनी कुणालाही येऊ द्या, घोडा मैदान जवळ असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले मंत्री महाजन ?
गणपती बाप्पाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. त्याला काय करायचे हे माहिती आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार मोठ्या मताधिक्यात येणार असल्याचा दावा देखील मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. दिलीप खोपडे यांच्याबाबत बोलण्यात मात्र त्यांनी नकार दिला. गेल्या सहा टर्म पासून आपल्या विरोधात अनेक जण लढा देऊन थकले आहेत. आता कोणालाही येऊ द्या, घोडा आणि मैदान समोरच आहे. निवडणूक संपल्यावर माझ्याशी बोला, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी माध्यमांना दिली आहे.
21 रोजी प्रवेशाची शक्यता
दिलीप खोपडे हे जळगाव जिल्ह्यातील मराठा नेते म्हणून ओळखले जातात. जामनेर मतदार संघात मराठा समाजाचे एक लाख 40 हजार मतदार आहेत. त्यामुळे दिलीप खोपडे हे मंत्री गिरीश महाजन यांच्या समोर मोठे आव्हान उभे करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची शिवस्वराज्य यात्रा ही 21 तारखेला जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. या यात्रेदरम्यान खोपडे यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.
मात्र, खोपडे यांच्या प्रश्नावर गिरीश महाजन यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. गेल्या सहा टर्मपासून माझ्या विरोधात अनेक जण लढून थकले आहेत. आता कोणालाही येऊ द्या, अशा शब्दात गिरीश महाजन यांनी खोपडे यांच्या प्रश्नावर प्रत्युत्तर दिले.