पुणे (वृत्तसंस्था) राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकार अनेक गोष्टी अनलॉक करत आहेत. राज्यात आजपासून नाट्यगृहे आणि चित्रपटगृह सुरु होत आहेत. दरम्यान या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बोलताना महत्वाचं भाष्य केलं आहे. आज नाट्यगृहातील घंटा पहिल्यांदा वाजवली. दिवाळीनंतर पूर्ण क्षमतेने नाट्यगृह सुरु करण्याचा विचार करु, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांच्या हस्ते पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आजपासून नाट्यगृह सुरु झाल्याची औपचारिक घोषणा करण्यात आली. सकाळी ८ वाजता अजित पवार यांचं बालगंधर्व रंगमंदिरात आगमन झालं. अजित पवारांचा नाट्य परिषद आणि कलाकारांच्या वतीनं सन्मान करण्यात आला. शिंदेशाही पगडी घालून आणि तलवार देऊन अजितदादांचा सन्मान करण्यात आला. मंचावर विविध पक्षाचे राजकीय नेते, नाट्य परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यानंतर केलेल्या भाषणात अजित पवार म्हणाले, “उपस्थित सर्व कलाकार बंधु भगिनींनो, आज वेगळ्या कार्यक्रमासाठी एकत्रित जमलोय. निसर्गापुढे काही चालत नाही, १९ महिने हे सगळं बंद होतं, कलाकार सारखे भेटायचे, नाट्यगृह कधी सुरु होणार म्हणून प्रश्न विचारायचे, पण आज अखेर आपण नाट्यगृह सुरु करण्याला परवानगी दिलेली आहे. आम्हाला देवळातली घंटा वाजवायची सवय आहे मात्र मी पहिल्यांदा नाट्यगृहातील घंटा वाजवली”
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, “आताही सगळे कलाकार विचारतायेत की पूर्ण क्षमतेने नाट्यगृह कधी सुरु करणार… मी आपल्याला सांगू इच्छितो, दिवाळीनंतर पूर्ण क्षमतेने नाट्यगृह सुरु करण्याबाबत विचार करतोय. तिसरी लाट येऊ नये म्हणून आपणा सर्वांना निश्चित खबरदारी घ्यावी लागेल. आम्हाला बंद करायला आवडत नाही मात्र खबरदारी घेतली पाहिजे”
दिवाळीनंतर पूर्ण क्षमेतेने नाट्यगृह सुरु करण्याचा विचार आहे. कलाकारांनी दिवाळीनंतर भेटावं. मी पुण्याच्या महापौरांना भेटेन, याबाबत चर्चा करेन. जर परिस्थित चांगली असेल, कोरोनाचा धोका नसेल तर नाट्यगृह १०० टक्के क्षमतेनं सुरु करण्याला आम्ही परवानगी देणार असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं.