मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांना एका अज्ञात व्यक्तीकडून धमकीचे पत्र मिळाले आहे. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानचे वडील सलीम खान हे सकाळी जॉगिंगसाठी गेले होते. तिथे ते एका बेंचवर बसले असता त्यांना एक पत्र मिळालं. ज्यामध्ये त्यांना आणि त्यांचा मुलगा सलमान खानला धमकी देण्यात आली होती. या पत्रात लिहिलं होत की, सलमान खान याचा सिद्धू मुसेवाला करून टाकू. सकाळी 7:30 ते 8:00 च्या सुमारास सलीम खान यांना हे पत्र मिळाले. हे धमकीच पत्र मिळाल्यानंतर सलीम खान यांनी वांद्रे पोलीस स्थानकात एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
अलीकडेच पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. अनेक जणांनी मिळून त्याच्यावर सुमारे 25-30 गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. सिद्धू मुसेवाला यांच्या निधनानंतर संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. दरम्यान, सलमान खानला धमकीचे पत्र आल्यानंतर त्याचे चाहते सोशल मीडियावर चिंता व्यक्त करत आहे.