अन्न, वस्त्र, निवाऱ्यासारखीच वीज ही आपल्या आयुष्यातील आज मूलभूत गरज बनली आहे. विजेशिवाय जगण्याची कल्पनाच करता येणार नाही, इतके अनन्यसाधारण महत्त्व विजेला आहे. मुंबईचा काही भाग वगळता चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रातील घराघरात वीज पोचवण्याचे काम महावितरण करते. या वीज वितरण यंत्रणेचा कणा असलेल्या जनमित्रांच्या अर्थात लाईनमेनच्या कार्याचा उचित गौरव करण्यासाठी ४ मार्च हा दिवस देशभर ‘लाईनमन दिवस’ म्हणून साजरा करण्यात येत आहे.
मिनिटभरही आपल्या घराचा वीजपुरवठा खंडित झाला की ग्राहक तो कधी सुरू होईल याची वाट पाहत असतात. यादरम्यान महावितरणचे अभियंते आणि जनमित्र यांना कोणत्या परिस्थितीत व विविध अडथळ्यांना तोंड देत रात्रीअपरात्री कोणती व कशी कामे करावी लागतात याची माहिती फारशी कोणाला नसते. परंतु अभियंते आणि जनमित्र यांची अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही विद्युतसेवा देण्याची धडपड आणि अथक प्रयत्न समजून घेतले तर त्यांच्या कर्तव्य बजावण्याच्या प्रयत्नांना खरा न्याय दिल्यासारखे होईल. विजेच्या निर्मितीनंतर पारेषण, वितरण अशा टप्प्यांमध्ये ग्राहकांच्या दारापर्यंत वीजपुरवठा केला जातो. महानगरापासून ते खेड्यापाड्यापर्यंत सर्व प्रकारच्या ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणचे अभियंते व जनमित्रांना दक्ष राहावे लागते. वीज दिसत नाही. वीजयंत्रणेत काम करण्याचा कितीही वर्षांचा अनुभव असला तरी विजेशी मैत्री होऊ शकत नाही. त्यामुळे एखाद्या क्षणी अनावधानाने झालेली चूकही जीवावर बेतू शकते. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रात्री-अपरात्री अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व धोकादायक आव्हाने पेलून अभियंता व जनमित्रांना वीजपुरवठा सुरळीत करण्याचे कर्तव्य बजवावे लागते.
वीजपुरवठा खंडित झाला की तो पूर्ववत होईपर्यंतचा काळ हा वीजग्राहकांना नकोसा असतो, एवढी विजेची गरज प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात निर्माण झाली आहे. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी साधारणतः उन्हाळा ते पावसाळ्यातील ८ ते ९ महिन्यांचा कालावधी अतिशय आव्हानात्मक व खडतर असतो. उन्हाचा तडाखा, तापलेली वीजयंत्रणा, वाढलेली विजेची मागणी त्यानंतर वादळे, अवकाळी पाऊस व त्यानंतरचा मान्सूनचा संततधार पाऊस, पूर अशा प्रतिकूल परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणचे जनमित्र सज्ज असतात. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रात धडकलेले ‘निसर्ग’ व ‘तौक्ते’ चक्रीवादळे, राज्यातील विविध ठिकाणची पूरस्थिती आणि महाभयंकर कोविडच्या महामारीमुळे वीजक्षेत्रासमोर अत्यंत कठीण परिस्थिती होती.
अशाही स्थितीत महावितरणच्या प्रत्येक जनमित्राने वीजग्राहकांना प्रकाशात ठेवण्यासाठी अविरत, अथक कर्तव्य बजावले आहे. खरे पाहता महावितरणच्या पुरुष व महिला तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांवर २४ तास वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासह इतर विविध ग्राहकसेवा देण्याची जबाबदारी आहे. यासोबतच थकीत वीजबिलांची वसूली करणे, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करणे, वीजचोरीविरोधात कारवाई करणे आदी महत्वाची कामे करावी लागतात. महावितरणच्या ग्राहकसंख्येत दरवर्षी सुमारे १० लाखांची भर पडत आहे. सोबतच विजेची मागणीही सुमारे १० टक्क्यांनी वाढत आहे. सुमारे ११ लाख ३१ हजार किलोमीटर उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या अन् सुमारे ८ लाख २२ हजार वितरण रोहित्रांच्या यंत्रणेतून राज्यातील २ कोटी ९२ लाखांवर वीजग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येत आहे. भूकंप असो की चक्रीवादळ, अनेक नैसर्गिक आपत्तीमध्ये महावितरणच्या जनमित्रांनी काळोखात बुडालेल्या लाखो वीजग्राहकांना प्रकाशमान करण्यासाठी जीवाचे रान केले आहे.
अनेक प्रसंगी महापुरात बोटीने जाऊन किंवा नदीमध्ये पोहत जाऊन वीजयंत्रणेची दुरुस्ती करण्याचे धैर्य दाखवत वीजपुरवठा सुरु करण्याचे कर्तव्य जनमित्र दरवर्षी बजावतात याचा प्रत्यय अनेक जिल्ह्यांमध्ये आला आहे. केवळ महावितरणच्या ग्राहकांसाठी नव्हे तर मुंबई शहरातील सन २००६ च्या प्रलयात जाऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या जनमित्रांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यानंतर गेल्या दोन-तीन वर्षांमधील ‘निसर्ग’, ‘तौक्ते’ चक्रीवादळांनी जमीनदोस्त केलेली वीजयंत्रणा विक्रमी कालावधीत पूर्ववत केली. तसेच कोविड काळात लॉकडाऊनमुळे घरात असलेल्या प्रत्येक ग्राहकाला प्रकाशात ठेवण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जनमित्रांनी मोठे योगदान दिले आहे.
वीज यंत्रणेचा भलामोठा पसारा असल्याने जनमित्र यांना वेळी-अवेळी, रात्र असो की दिवस, उन असो, वादळ असो की पाऊस या सर्वच परिस्थितीमध्ये खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी संभाव्य धोके टाळून कर्तव्य पणाला लावावे लागते. धोकेही असे की, जाणते किंवा अजाणतेपणी झालेली चूक वीज माफ करीत नाही आणि थेट मृत्यूच्या दारात नेते. त्यामुळे अशा वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करण्याची कामे तसे जिकिरीचे व प्रसंगी जोखमीचे सुद्धा असते. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरळीत करण्यासाठी धडपडणाऱ्या सर्वच जनमित्रांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. वीजग्राहकांनी जनमित्रांच्या धडपडीची कुठेतरी दखल घ्यावी, एवढीच अपेक्षा. शेवटी कुसुमाग्रजांच्या प्रसिद्ध ‘कणा’ कवितेतील ओळींमध्ये बदल करून म्हणावेसे वाटते की,
‘जनमित्र हा विद्युत वितरण यंत्रणेचा कणा,
पाठीवरती हात ठेवून फक्त शाब्बास म्हणा’
(- ज्ञानेश्वर आर्दड,
जनसंपर्क अधिकारी,
महावितरण)