भुसावळ (प्रतिनिधी) मला डायबेटिस होता,परिक्रमा सुरू केल्यापासून 108 दिवसात एकही दिवस डायबेटीसची गोळी घेतली नाही, आता घरी आल्यावर रक्त तपासले असता,रक्तातील साखरेची पातळी ही अगदी बरोबर होती ,ही किमया फक्त माँ नर्मदा परिक्रमा मध्येच घडू शकते, असा स्वानुभव परिक्रमावासी डॉ. नितु पाटील यांनी रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी संघटनेच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात केले.
शहरातील प्रभाकर हॉल याठिकाणी भुसावळ शहरांतील रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी संघटनेच्या वतीने डॉ.नितु पाटील यांचा सत्कार आणि माँ नर्मदा परिक्रमा अनुभव कथनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी व्यासपीठावर रोटरी अध्यक्ष मनोज सोनार,सचिव तेजस नवगाळे उपस्थित होते.
पुढे डॉ. नितु पाटील म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मी कोरोना संक्रमित झालो होतो.शारीरिक परिस्थिती अवघड झाली होती. भुसावळ येथील ग्रामीण रुग्णालयात भरती झाल्यावर त्या ठिकाणी मी सात रेमेडीसीवर इंजेक्शन घेतले त्यामुळे आजार गेला पण मला डायबिटीस ची सुरुवात करून गेला. रक्तातील साखरेचे प्रमाण हे 200 च्या पुढे रहायचे, त्यामुळे औषधी सूरु झाल्या,तेव्हा आयुष्य भर आता डायबेटीस आपला सोबती राहणार हे मी मनोमन ठरवले होते.
माँ नर्मदा परिक्रमा सुरू करतांना सोबत जवळपास 3 महिन्यांची औषधी सोबत घेतली पण एकही दिवस औषधी घेतली नाही,शेवटी ओझं कमी करावे म्हणून सर्व औषधी फेकून दिली.घरी परतल्यावर वजन हे 13 किलोने कमी झाले तर रक्तातील साखरेचे प्रमाण हे अगदी बरोबर सामान्य आले.ही जादू फक्त माँ नर्मदा माता आणि परिक्रमा यातच आहे. चालणे हा उत्तम व्यायाम असून 108 दिवसात 3600 किलोमीटर अंतरावर चालत घेल्याने मातेच्या कृपेने माझा डायबेटीसचे समूळ उच्चाटन झाले आहे.त्यामुळे माँ नर्मदा परिक्रमा ही अध्यात्मिक प्रगतीसोबत आपली शारीरिक क्षमता देखील वाढवते,त्यामुळे प्रत्येकांने आयुष्यात एकदा तरी चालत चालत माँ नर्मदा परिक्रमा करावी.असे विविध अनुभव सांगितले.
यावेळी डॉ.समीर चौधरी, डॉ नीतीन दावलभक्त,सोनू मांडे,डॉ. मकरंद चांदवडकर,नितीन धांडे,विशाल शाह,हरमित सिंगमाथन,पुरुषोत्तम पटेल,डॉ. गिरीश शास्त्री ,श्रीकांत जोशी आदी सभासद उपस्थित होते. प्रस्तावित मनोज सोनार, परिचय डॉ. समीर चौधरी, आभार प्रदर्शन तेजस नवगाळे यांनी केले.कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला.