जळगाव (सुरेश उज्जैनवाल) राष्ट्रीय पुरुष, थोर नेते यांची जयंती साजरी करण्या मागे त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना असते. समाज त्यांना व त्यांच्या लोक कल्याणकारी कार्याला विसरलेला नाही, हे दर्शविण्याची समाजाची सामूहिक भावना असते. ही प्रस्तावना मांडण्याचे कारण की, परवा जळगाव मध्ये मोठ्या उत्साहात लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली. त्या निमित्त विविध कार्यक्रम झाले. सरदार पटेल याची जयंती दर वर्षीच साजरी केली जाते, मात्र यंदा या जयंती निमित्त सरदार पटेलांना अभिवादनाची जाहिरात सर्व सामान्यांचे लक्ष वेधणारी ठरली.
जळगाव मधील सर्वाधिक खप असलेल्या दोन दैनिकाच्या मुख पृष्ठावर झळकलेल्या जाहिराती सामाजिक ऐक्य भावने चा जणू आगळा वेगळा संदेश च म्हणावा लागेल. पूर्ण पान भर असलेल्या या जाहिरातीत ” लेवा समाज भूषण लोह पुरुष सरदार पटेल जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!” आणि पानाच्या मध्यभागी सरदार पटेलांची पूर्णाकृती प्रतिमा, तर पानाच्या डाव्या बाजूस सुप्रसिद्ध निसर्ग कवियत्री बहिणाबाई यांची प्रतिमा. या शिवाय लेवा समाजातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, वैद्यकीय, औद्योगिक आदी क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तीं ची छायाचित्रे आहेत, राजकीय मतभेदांना मूठ माती देत सामाजिक ऐक्या चा विलक्षण वेगळा पण परिणामकारक संदेश देण्याचा जळगाव जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग म्हणता येईल.
सरदार पटेलांच्या जयंती निमित्त अभिवादनपर जाहिरातीत ज्यांची छायाचित्रे आहेत, याची कल्पनाही जाहिरात छापण्यापूर्वी त्यांना नव्हती.या जाहिरातीत भाजप , काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षातील लेवा समाजाचे दोन आजी माजी खासदार, तीन विद्यमान आमदार, चार महिला माजी महापौर, पुरुष माजी महापौर ललीत कोल्हे तसेच लेवा समाजातील जळगाव मधील सोळा महिला, पुरुष नगरसेवक यांची छायाचित्रे तर आहेच, पण समाजाने विविध सर्व समाज घटकांच्या शिक्षणासाठी उभी केलेली खान्देश कॉलेज ऑफ एज्युकेशन सोसायटीचे प्रतिथयश अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, वैद्यकीय क्षेत्रात सेवे च्या दृष्टीने लौकिक प्राप्त डॉ.ए.जी.भंगाळे, लेवा समाजा चे कुटुंब नायक रमेश वीठू पाटील यांना ही अग्रस्थान दिलेले आहे. आणि हा आगळा वेगळा प्रयोग कृतीत आणला आहे जळगाव च्या पहिल्या नागरिक महापौर सौ.जयश्री सुनील महाजन आणि त्यांचे पती डॉ.सुनील सुपडू महाजन या दाम्पत्यांन..
महाजन दाम्पत्याने समाजाच्या सामाजीक दृष्टया एक संघतेसाठी उचललेलं हे पाऊल नुसतच कौतुकास्पद नाही तर राजकीय क्षेत्रात वाढत चाललेल्या टोकाच्या मतभेदाला सामाजिक ऐक्यासाठी दिलेला सकारात्मक संदेश म्हणता येईल. जाहिरातीत सर्वत खाली अभिवादक म्हणून महाजन दाम्पत्याची छायाचित्रे आहेत. सरदार पटेल यांच्या जयंती निमित्त अभिवादनपर जाहिरातीतून सुचलेली ही कल्पना नवा विचार देणारी ठरावी.
सरदार पटेलांची भुसावळ भेट
देशा चे पहिले गृहमंत्री सरदार पटेल याचं आणि जळगाव जिल्ह्यतील लेवा समाजाची नाळ घट्ट आहे, साधारणपणे सन 1949 -1950 दरम्यान ते एका जाहीर कार्यक्रमासाठी भुसावळ मध्ये आले होते, तेव्हा ते म्हणाले होते, मी रावेर मार्गे भुसावळ ला येत असताना शेतां कडे नजर गेली तेव्हा केळीच्या बागा बघून मला गुजराथ मधील माझे लेवा पाटील बांधव ज्या पद्धतीने शेती कसतात अगदी तशीच येथे पण दिसून आली असे गौरवोद्गार ही त्यांनी काढले होते असे ऐकिवात आहे,भुसावळ शहराचे तत्कालीन नगराध्यक्ष माजी आमदार देविदास भोळे यांनी भुसावळ शहरात सुमारे 35 वर्षा पूर्वी सरदार पटेलांचा अर्ध पुतळा बसविला होता.
-सुरेश उज्जैनवाल, ज्येष्ठ पत्रकार जळगाव