जळगाव दि. ४ प्रतिनिधी – महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा जैन हिल्स येथील परिश्रम हॉल येथे अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सल्लागार अशोक जैन, ग्रॅण्डमास्टर अभिजीत कुंटे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनचे कार्यकारी अध्यक्ष सिध्दार्थ मयूर, सचिव निरंजन गोडबोले, कोषाध्यक्ष विलास म्हात्रे, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन यांच्या प्रमूख उपस्थित पार पडली. महाराष्ट्रातून जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकाऱ्यांसह मान्यवरांनी त्यात सहभाग घेतला. चेस इन स्कूलसह विविध दहा विषयांवर सर्वांच्या चर्चेअंती मंजूरी देण्यात आली.
अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनच्या सर्व साधारण सभेत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. उपाध्यक्ष फारूख शेख (जळगाव), निनांत पेडेनेकर (पालघर), सहसचिव अंकुश रक्ताडे (बुलढाणा), पुरुषोत्तम भिलारे (मुंबई) यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा असोसिएशनचे दोन पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २८ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या मागील सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्तांचे वाचन करण्यात आले. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठीच्या खात्यांची पुष्टी करुन मंजूर करण्यात आले. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी लेखापरीक्षकांची नियुक्ती करुन त्यांचे मानधन निश्चित केले गेले. २०२४-२५ चा वार्षिक अहवाल मंजूर केला गेला. चेस इन स्कूल अंतर्गत शाळेत बुद्धिबळ कार्यक्रमाबद्दल विशेष चर्चा करण्यात आली. जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी चेस इन स्कूल चे सुरु असलेले कार्यक्षेत्र वाढविण्यावर चर्चा केली. चेस इन स्कूलसाठी प्रत्येक जिल्ह्यात सेमिनार घेण्यात यावे, पुढील तीन वर्षात चेस इन स्कूल उपक्रमाची व्याप्ती कशी वाढेल यावरही त्यांनी भाष्य केले. त्यासाठी विशेष वेब साईड सुरू करुन चेस इन स्कूल हा उपक्रम राबविली जाणार असल्याचे अतुल जैन म्हणाले. महाराष्ट्र आर्बिटर कमिशनने नियुक्त केलेल्या चिफ व डेप्युटी आर्बिटरच्या मानधनात वाढ करण्याबाबत आर्बिटर कमिशनचे अध्यक्ष पी. बी. भिलारे यांनी सादर केलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली त्यानंतर आर्बिटर यांचे मानधनात वाढ करण्याचा निर्णयसुद्धा घेण्यात आला. आर्थिक नियमांमधील बदलांवरसुद्धा चर्चा करुन निर्णय घेण्यात आला. स्पोर्टस पॉलिसी व कोड यावर चर्चा करण्यात आली. वार्षिक सर्वसाधारण सभेचा समारोपावेळी अशोक जैन यांनी सल्लागार म्हणून मार्गदर्शन केले. त्यात ते म्हणाले, महाराष्ट्रात आधी दोन ग्रॅण्डमास्टर होते आता जवळपास १४ झाले हे यश विद्यार्थ्यांचे प्रज्ञेचे असून त्यासाठी वातावरण निर्माण करणाऱ्या महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनच्या सुरु असलेल्या विविध उपक्रमाचे सुद्धा आहे. अजूनही २४ जिल्ह्यांमध्ये आपले कार्य सुरु असून ते अधिक सक्रिय पद्धतीने वाढविता येऊ शकते असे त्यांनी सांगितले. निरंजन गोडबोले यांनी समन्वय साधला.
फोटो कॅप्शन – जैन हिल्सच्या परिश्रम हॉल येथे झालेल्या महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी अशोक जैन, अभिजीत कुंटे, अतुल जैन, निरंजन गोडबोले, सिद्धार्थ मयूर, फारुख शेख, पुरूषोत्तम भिलारे, प्रविण ठाकरे यांच्यासह महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा असोसिएशनचे पदाधिकारी.