मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या घराबाहेर झालेल्या हिंसक आंदोलनावरून शिवसेनेनं भाजपवर तोफ डागली आहे. गुणरत्न सदावर्तेंसह गोपीचंद पडळकरांवरही सेनेनं सामना अग्रलेखातून निशाणा साधला. माकडांच्या हातात विरोधी पक्षाने कोलीत देऊ नये. महाराष्ट्र गुणांचा पूजक आहे, माथेफिरू गुणरत्नांचा नाही, असा सल्ला भाजपला देत गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्यावर टीका करण्यात आली आहे.
शरद पवारांच्या घरावर हल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय सलोख्यास, संस्कृतीस काळिमा फासणारे कृत्य आहे. कामगार चळवळही यामुळे बदनाम झाली आहे. एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे ही एक मागणी सोडली तर कामगारांच्या बहुतेक मागण्या मान्य झाल्या. 92 हजार एस.टी. कामगारांपैकी बहुसंख्य कामावर रुजू झाले, पण कोणीएक गुणरत्न सदावर्तेच्या चिथावणीमुळे कामगारांचा एक गट आझाद मैदानावर लढण्याच्या गर्जना करीत बसला होता. यापैकी एक ‘झुंड’ शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचली व त्यांनी दगड, चपला वगैरे फेकून हल्ला केला. सदावर्ते हा माणूस अचानक उपटला व त्याला प्रसिद्धीमाध्यमांतून अकारण मोठेपण दिले गेले. सदावर्तेचा भस्मासुर निर्माण करण्यात विरोधी पक्षाचे योगदान आहे असे स्पष्ट दिसत असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
विरोधकांना स्वतःला ज्या लढाया लढता येत नाहीत तेथे असे ‘गुणरत्न’ ताब्यात घेऊन त्यांच्या डोक्यात झिंग भरून महाविकास आघाडीच्या विरोधात उभे केले जाते. भाजपने त्यांच्या नव्या गुणरत्नाचे योग्य प्रकारे पालनपोषण केले व भाजपमधील नवहिंदुत्ववादी पुढारी ठाकरे-पवारांसारख्या ज्येष्ठ नेतृत्वाविषयी ज्या चिथावणीखोर भाषेचा वापर करतात, त्याच मार्गाचा अवलंब गुणरत्नाने केला. शरद पवार यांच्याबाबतीत भाजपने दत्तक घेतलेल्या नवरत्नांनी जी भाषा वापरली, तोच कित्ता गुणरत्नाने गिरवला. गुणरत्नाने एस.टी. कर्मचाऱ्यांसमोर अनेकदा चिथावणीची भाषणे केली व पवारांच्या घरात घुसून जाब विचारण्याचे आव्हान दिले. कामगारांचे प्रश्न सुटावेत असे सरकारला वाटत होते, पण भाजप व त्यांच्या गुणरत्नांना तसे वाटत नसावे. वातावरण अधिकाधिक चिघळावे यासाठीच प्रयत्न केले गेले, असा आरोप शिवसेनेने केला आहे.
भाजपचे फडणवीस हे पाच वर्षे मुख्यमंत्री होते. त्या काळात एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण का झाले नाही, हा विचार हिंसा करणाऱयांच्या डोक्यात का आला नाही? गेल्या चारेक महिन्यांपासून ज्या पद्धतीची चिथावणीखोर आणि माथेफिरू पद्धतीची भाषणे हे गुणरत्ने करीत होते, तेव्हाच मुंबईतील कायद्याच्या रक्षकांनी सावध व्हायला हवे होते. शहरी नक्षलवाद समजून घ्यायचा असेल तर गुणरत्नाच्या वर्तनाकडे व भाषेकडे डोळसपणे पाहायला हवे. भीमा-कोरेगाव प्रकरणात अटकेत असलेले अनेक लेखक, विचारवंत, कवी यांच्यावर शहरी नक्षलवादी असल्याचा ठपका आहे. त्यांना फडणवीस व मोदींचे राज्य उलथवून टाकायचे होते, त्यांच्यापासून फडणवीस-मोदींच्या जीवितासही धोका होता असे आक्षेप आणि आरोप भाजपची मंडळी सातत्याने करीत आली आहेत. सध्याच्या गुणरत्नाच्या कारवायाही त्याच शहरी नक्षलवादी चौकटीतच सुरू आहेत व त्याला खतपाणी घालण्याचे काम महाराष्ट्रातील विरोधी पक्ष करीत होता, असेही शिवसेनेने म्हटले आहे.