बुलढाणा (वृत्तसंस्था) बुलढाणा शहरालगतच्या राजूर घाटात एका ३५ वर्षीय महिलेवर आठ नराधमांनी चाकूचा धाकावर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
या संदर्भात अधिक असे की, पीडित महिला ही तिच्या नातेवाईक व्यक्तीच्या एका मित्रासोबतच राजूर घाटातून दुपारी जात होती. दोघं जण राजूर घाटात सेल्फी काढण्यासाठी थांबले असता त्याठिकाणी आठ जण आले. पिडीतेच्या गळ्याला चाकू लावून आरोपींनी पीडित महिलेला घाटातील देवीच्या मंदिरा मागील दरीत नेले. तेथे आरोपींनी पीडितेवर आळीपाळीने सामुहिक बलात्कार केला. पीडित महिला व तिच्या समवेत असलेला व्यक्ती राजूर घाटात देवीच्या मंदिरानजीक सेल्फी काढण्यासाठी थांबले होते. या वेळी त्या ठिकाणी आठ जणांचा हा घोळका आला होता. त्यांनी पिडीतेच्या गळ्याला चाकू लावून सोबत असलेल्या व्यक्तीच्या खिशातील ४५ हजार रुपये लुटले. त्यानंतर महिलेला दरीत ओढत नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.
तात्काळ गुन्हा दाखल करण्यासाठी आमदार संजय गायकवाड यांनी तब्बल तीन तास पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्कार केल्यानंतर हे आरोपी फरार होत असताना तक्रारकर्त्याने त्यांचा पाठलाग केला असता हे आरोपी मोहेगाव येथे गेले. मोहेगावच्या लोकांनी त्यातील एक आरोपी राहुल राठोड नावाचा असल्याची माहिती तक्रारकर्त्याला दिली आहे. यापूर्वी देखील याच राजुर घाटात बरेचदा बलात्काराच्या घटना घडल्या असल्याची माहिती आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे. मात्र बदनामी पोटी तक्रारी दाखल केल्या जात नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. एका बलात्काराच्या घटनेत पोलिसांना फोन केल्यानंतरही त्यांनी दखल घेतली नसल्याचा गंभीर आरोप आमदार गायकवाड यांनी केला आहे.
















