नवी मुंबई (वृत्तसंस्था) नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची बैठक पार पडली आहे. यावेळी भाजपला धक्का देण्यासाठी तिन्ही पक्षांनी एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत नवी मुंबईत महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युलादेखील निश्चित करण्यात आला.
या बैठकीला शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, संदीप सुतार उपस्थित होते. नवी मुंबईत महापालिकेतील एकूण सदस्य संख्या १११ इतकी आहे. त्यात आता १० जागांची भर पडणार आहे. त्यामुळे हा आकडा १२१ वर जाईल. यापैकी ७५ ते ८० जागा शिवसेना लढवेल. तर राष्ट्रवादी काँग्रेस २० ते २५ आणि काँग्रेस १८ ते २२ जागांवर उमेदवार देतील. एबीबी माझानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. पुढील २ ते ३ महिन्यांत महापालिका निवडणूक होऊ शकते.
पुढील महापालिका निवडणुकीत सत्ता राखण्याचं आव्हान भाजप नेते गणेश नाईक यांच्यासमोर आहे. गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी नाईक भाजपमध्ये गेले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या बऱ्याचशा नगरसेवकांनी हाती कमळ घेतलं. त्यामुळे राष्ट्रवादीला महापालिकेतील सत्ता गमवावी लागली.