औरंगाबाद (वृत्तसंस्था) राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा संसार सुरळीत चालल्याचे दावे केले जात होते. पण काँग्रेसमधून सरकार बाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात महाविकास आघाडीच सरकार स्थापन झाल्यानंतर सत्ताधारी आघाडीत मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी कार्यक्रमात केलेल्या तक्रारीमुळं काँग्रेस नाराज असल्याच्या म्हटले जात आहे. काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं होतं. चव्हाणांच्या या वक्तव्यामुळं पुन्हा एकदा काँग्रेसमधील खदखद समोर आल्याचं म्हटलं जातं आहे. ‘काँग्रेसच्या पालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही. मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला,’ असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळं चव्हाणांच्या या विधानामुळं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, याआधीही महाविकास आघाडीतील मतभेद समोर आले होते. तेव्हा पक्षातील जेष्ठ नेत्यांनी यावर पडदा टाकताना महाविकास आघाडीत सर्व सुरळीत आहे असं म्हंटल होतं. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच वारंवार बैठका होत असताना काँग्रेसला मात्र, सरकारच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेतले जात नाही. यामुळे काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून खदखद आहे. त्यामुळं अशोक चव्हाण यांनी थेट पत्रकारांकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे. आघाडीत बराच अंतर्गंत तणाव असल्याचं उघड झालं आहे. राज्यात महाविकास आघाडीच सरकार स्थापन झाल्यानंतर देखील मतभेद सुरूच आहेत.