रांची (वृत्तसंस्था) जीवघेण्या कोरोना व्हायरसचा शिरकाव आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या घरातही झाला आहे. एमएस धोनीचे वडिल पान सिंह धोनी आणि आई देवकी सिंह धोनी यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर दोघांनाही झारखंडची राजधानी रांची येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
स्टार क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी आयपीएलमध्ये व्यस्त असताना त्याचे आई-वडील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. धोनीच्या पालकांना रांचीमधील बरियातू रोडवर असलेल्या पल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती सामान्य असल्याची माहिती आहे. धोनीच्या आई-वडिलांची ऑक्सिजन लेव्हलही प्रमाणात असल्याने काळजीचं कोणतंही कारण नाही. पल्स रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार सुदैवाने कोरोना दोघांच्याही फुफ्फुसांपर्यंत पोहोचलेला नाही. दोघांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होऊन ते निगेटिव्ह येतील आणि त्यांना डिस्चार्ज मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
















