नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सर्वोच्च न्यायालायात आज शिवसेना व शिंदे गटाच्या राजकीय भविष्यावर सुनावणी सुरु आहे. दोन्ही गटाकडून दाखल सर्व याचिकांवर सुप्रीम कोर्टात एकत्रित सुनावणी चालू आहे. कपिल सिब्बल हे शिवसेनेची तर हरीश साळवे हे शिंदे गटाकडून बाजू मांडत आहेत.
सिब्बल यांनी केलेल्या युक्तिवादात म्हटले आहे की, विधीमंडळात बहुमत म्हणजे पक्षाची मालकी नाही. उद्या कोणतीही सरकार बहुमतावर पाडली जातील. अजूनही पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच असून तसेच याचिकेत नमूद केले आहे. शिंदे गटाकडे बहुमत जास्त असले म्हणजे याचा अर्थ त्यांचा पक्षावर दावा होत नाही. शिंदे गटाकडून व्हिपचे उल्लंघन झाले, गट वेगळा असला तरी शिंदे गटातील आमदार शिवसेनेचेच सदस्य आहेत. पक्ष म्हणजे केवळ आमदारांचा गट नाही. या लोकांना पक्षाच्या बैठकीत बोलावण्यात आले होते. मात्र, ते आले नाहीत. उपसभापतींना पत्र लिहिले. खरे तर त्यांनी पक्ष सोडला आहे. त्यामुळे ते मूळ पक्ष असल्याचा दावा करू शकत नाहीत. आजही शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आहेत. 2 तृतीयांश आमदार वेगळे व्हायचे असतील, तर त्यांना कोणत्या तरी पक्षात विलीन व्हावे लागेल किंवा नवीन पक्ष काढावा लागेल. तो मूळ पक्ष आहे असे म्हणता येणार नाही. त्यांना कायद्याने हे करायचे होते. त्यांनी (शिंदे गट) ज्या प्रकारे पक्षाचे सदस्यत्व सोडले आहे, त्यानुसार ते आपणच मूळ पक्ष असल्याचा दावा करू शकत नाहीत. घटनेची 10 वी अनुसूची यास परवानगी देत नाही, असेही सिब्बल यांनी म्हटले आहे.
तर दुसरीकडे आतापर्यंत कुणावरही अपात्रतेची कारवाई नाही, पक्ष सोडल्यानंतरच पक्षांतर बंदी कायदा लागू होतो आणि शिंदे गटानं पक्ष सोडलेला नाही. तसेच बहुमत गमावलेल्या नेत्यासाठी पक्षांतर बंदी कायदा शस्त्र नाही, असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील हरिश साळवेंनी केला आहे. आयोगासमोरील याचिका आणि कोर्टातील याचिका यांचा एकमेकांशी संबंध नाही असं हरिश साळवे यांनी म्हटलं आहे. यावर न्यायमूर्तांनी मग तुम्ही निवडणूक आयोगाकडे का गेलात? अशी विचारणा यावेळी केली. यावर हरिश साळवे यांनी, पक्ष एकच आहे, फक्त खरा नेता कोण याचं उत्तर हवं आहे असं सांगितलं. पक्ष सोडला असला तरच पक्षांतर बंदी कायदा लागू होतो असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सरन्यायाधीश यांनी सर्व पक्षकारांनी या प्रकरणाशी संबंधित कायदेशीर प्रश्न सादर केले आहेत का?. असा प्रश्न विचारला आहे. तसेच सिब्बल यांच्या युक्तिवादावर तुम्ही म्हणताय की, त्यांनी भाजपमध्ये विलीन व्हायला हवे होते किंवा वेगळा पक्ष काढायला हवा होता, असे सरन्यायाधीश म्हटले. दरम्यान, आधी उद्धव सरकार तरते की, गडगडते याकडे लक्ष लागून राहिलेल्या जनतेला आता शिंदेशाही स्थिरावते की, कोसळते याचीही उत्सुकता आहे. त्याचाच आज फैसला होणार आहे.
…तर शिंदे सरकार कोसळणार
आमदारांना अपात्र ठरवल्यास राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळू शकते, असे जाणकार सांगत आहेत. तर सरकारच्या बाजूने निकाल आल्यास येत्या चार दिवसात राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे आजचा कौल कुणाच्या बाजूने जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले. आजचा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. तर निकालानंतर शिवसेनेचे अस्तित्वावरील प्रश्नावरही उत्तरे मिळणार आहेत.
‘या’ आमदारांवर टांगती तलवार
एकनाथ शिंदे,अब्दुल सत्तार, तानाजी सामंत, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, महेश शिंदे संजय रायमुलकर, रमेश बोरनारे, चिमणराव पाटील, यामिनी जाधव, संदिपान भुमरे, भरत गोगावले, संजय शिरसाट, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे. यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. यांच्या संदर्भात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर निर्णयाची शक्यता असून आज या आमदारांचा फैसला होईल.