नशिराबाद (प्रतिनिधी) नशिराबादच्या विकासाला आपण आधीच प्राधान्य दिलेले असून शहराचा कायापालट करायचा असेल तर शिवसेनेचा नगराध्यक्ष करा असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.
नशिराबाद येथे शिवसेनेचा पक्ष मेळावा तसेच युवासेना आणि शिवसेना शाखांच्या उदघाटनप्रसंगी ते म्हणाले की, येथील सर्व गट-तट हे आपसातील वाद विसरून आलेत हा शुभशकून आहे. आपण कुणावर टिकाटिपण्णी न करता विकासकामांच्या माध्यमातून विकासाची मोठी रेषा काढणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. शिवसेनेत पक्षनिष्ठेला महत्व दिले जाते. जाती-पातीपेक्षा कर्तव्यदक्ष उमेदवारांना आमचे प्राधान्य असते. तसेच शिवसेनेकडे मुस्लीम समुदायाचा कल वाढला असून याचीच प्रचिती या समुदायातील शेकडो कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधल्याच्या घटनेतून दिसून आल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. कुणाकडे किती ताकद आहे, यापेक्षा त्याचा वापर कसा होतो हे महत्वाचे असते, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकोप्याने काम करून नगरपरिषदेवर भगवा फडकावण्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन त्यांनी केले. या मेळाव्याआधी शहरातून ना. गुलाबराव पाटील यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. तर आपल्या घणाघाती भाषणातून पालकमंत्र्यांनी आगामी नगरपंचायत निवडणुकीसाठी रणशिंग फुंकल्याचेही दिसून आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संपर्क प्रमुख संजय सावंत तर उदघाटक शिवसेनेचे उपनेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णूभाऊ भंगाळे, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, महानगरप्रमुख शरद तायडे, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कैलास चौधरी, संगानियोचे तालुकाध्यक्ष रमेशआप्पा पाटील, करीम कल्ले, युवा सेना जिल्हा युवा अधिकारी शिवराज पाटील, पंचायत समिती सभापती जनाआप्पा पाटील (कोळी), पंचायत समिती सदस्य नंदलाल पाटील, मुकेश सोनवणे, डॉ. कमलाकर पाटील, तत्कालीन सरपंच विकास पाटील, उपतालुका प्रमुख दगडू माळी, शहर प्रमुख विकास धनगर, युवा सेना तालुका प्रमुख चेतन बर्हाटे, चंद्रकांत भोळे, बंडू रत्नपारखी, आप्पा धर्माधिकारी, नितीन बेंडवाल, भूषण कोल्हे, मोहन कोलते, संदीप पाटील, दीपक सपकाळे, ज्ञानेश्वर घोळकर, बापू चौधरी, आबा माळी आदींसह परिसरातील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती होती.
ना. गुलाबराव पाटील यांचे नशिराबाद शहरात आगमन होताच त्यांचे प्रचंड आतषबाजी करून स्वागत करण्यात आले. यानंतर शहरातून त्यांची भव्य फेरी काढण्यात आली. यानंतर कार्यक्रमस्थळी गगनभेदी घोषणांच्या गजरात पालकमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक तत्कालीन सरपंच विकास पाटील यांनी केले. नशिराबादच्या विकासाचा शब्द भाऊंनी दिला असून या झंझावाती कामांना प्रारंभ झाला असल्याबद्दल त्यांनी आभार मानत भविष्यातही शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे होतील अशी ग्वाही दिली. शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी आपल्या भाषणातून लक्षावधी शिवसैनिकांशी थेट संपर्क असणारे नेते हे गुलाबभाऊ असल्याचे आवर्जून नमूद केले. नशिराबाद नगरपांयतीवर भगवा डौलाने फडकणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ आणि जिल्हा प्रमुख विष्णूभाऊ भंगाळे यांनी आपल्या मनोगतांमध्ये पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात शिवसेनेचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत असल्याचे नमूद केले.
याप्रसंगी शिवसेन आणि युवा सेना शाखांचे उदघाटन आणि फलक अनावरण करण्यात आले. याप्रसंगी मुस्लीम समुदायातील शेकडो कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधले. त्यांचे पालकमंत्री आणि अन्य मान्यवरांनी स्वागत केले. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ आणि नशिराबादचे तत्कालीन सरपंच विकास पाटील यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला. तर संजय गांधी निराधार योजनेच्या १०० लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर करण्यात आली असून या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
शिवसेना व युवासेनेची अशी आहे कार्यकारणी
नशिराबादमध्ये शिवसेनेच्या ३ तर युवासेनेच्या ७ शाखांचे उदघाटन आणि फलक अनावरण करण्यात आले. यात भवानीनगर शाखाप्रमुख-प्रदीप नाथ व उपशाखा प्रमुख प्रफुल्ल पाटील; वरची आळी शाखा प्रमुख रवींद्र पाटील व उप शाखा प्रमुख संतोष पवार; बस स्थानक परिसर शाखा प्रमुख हर्षल माळी व उपशाखाप्रमुख शुभम माळी यांचा समावेश आहे. तर युवासेना शाखांमध्ये इंदिरा चौक शाखाप्रमुख निलेश धनगर व उपशाखा प्रमुख दीपक गंजम; होळी मैदान शाखा प्रमुख दीपक बोंडे व उपशाखा प्रमुख किरण बर्हाटे; भीलवाडी परिसर शाखा प्रमुख किशोर बागले व उपशाखा प्रमुख किरण बागले; सप्तश्रुंगी चौक शाखा प्रमुख गजानन पाचपांडे व उपशाखा प्रमुख जीवन कोलते; बेळी रोड परिसर शाखाप्रमुख दिनेश माळी व उपशाखा प्रमुख सोपान कोळी; भवानीनगर परिसर शाखा प्रमुख दीपक सपकाळे व उपशाखा प्रमुख मनोज देशमुख तसेच देशप्रेमी चौक शाखा प्रमुख विशाल झोपे व उपशाखा प्रमुख योगेश साळी यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी आर. खंडारे सर यांनी केले तर आभार युवा सेना तालुका युवा अधिकारी चेतन बर्हाटे यांनी मानले.