कोलकाता (वृत्तसंस्था) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी आज त्यांच्या बालेकिल्ल्यातून म्हणजेच भवानीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. जर त्यांना बंगालच्या मुख्यमंत्रीपदावर कायम रहायचं असेल तर ही निवडणूक जिंकणं अनिवार्य आहे.
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल २ मे रोजी जाहीर झाला. यामध्ये तृणमूलला घवघवीत यश मिळालं असलं तरी ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममधून पराभवाला सामोरं जावं लागलं. यानंतरही ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सध्या ममता बॅनर्जी या विधानसभेच्या सदस्या नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या शपथेनंतर सहा महिन्याच्या आत त्यांना विधानसभेवर निवडून येणं आवश्यक आहे.
आपल्या मुख्यमंत्रीपदाची खुर्ची टिकवण्यासाठी आता ममता बॅनर्जी यांनी आपल्या पारंपरिक मतदारसंघाचा, भवानीपूरचा आधार घेतला असून या ठिकाणचे आमदार सोभन देव चटोपाध्याय आता खरदाह विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. ममता बॅनर्जी यांनी या आधी भवानीपुरातून दोन वेळा विजय प्राप्त केला आहे. भवानीपूर सोबतच शमशेरजंग आणि जंगीपूर या जागांसाठी ३० सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने काही नियम व अटी लागू केल्या आहेत. प्रचारासाठी केवळ ५० टक्के लोकांचा सहभाग असेल, केवळ २० स्टार प्रचारक प्रचार करतील आणि मतदान सपण्यापूर्वी आधी ७२ तास प्रचार संपेल असे नियम निवडणूक आयोगाने घालून दिले आहेत.
२०११ मध्ये ममता बॅनर्जी भवानीपूरमधून विधानसभेवर
२०११ मध्ये जेव्हा तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आली तेव्हाही ममता बॅनर्जी या विधानसभेच्या सदस्य नव्हत्या. तेव्हा त्यांनी भवानीपूरमधून पोटनिवडूक लढवली आणि विधानसभेवर गेल्या. २०११ च्या निवडणुकीत सुब्रत बख्शी यांचा विजय झाला होता. तेव्हा त्यांनी ममता यांच्यासाठी आपली जागा देऊ केली. तेव्हा ममता यांनी सीपीएमच्या उमेदवार नंदिनी मुखर्जी यांचा ९५ हजाराच्या फरकारने पराभव केला होता. तेव्हा भाजप पश्चिम बंगालमध्ये 3 नंबरचा पक्ष ठरला होता.