मुंबई (वृत्तसंस्था) भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या (बीपीसीएल) खासगीकरणाची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे. अनेक मोठ्या कंपन्यांनी यामध्ये स्वारस्य दाखवलं आहे. परंतु रिलायन्स इंडस्ट्रीज, सौदी अरामको, बीपी आणि टोटल यासारख्या बड्या तेल कंपन्यांनी देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या इंधन कंपनीसाठी सुरू असलेल्या बोली प्रक्रियासाठी मात्र रस दाखवला नाही.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमधील सरकारच्या ५२.९८ टक्के हिस्स्याच्या विक्रीसाठी अनेक कंपन्यांनी रस दाखवला असल्याची माहिती सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहिन कांत पाडे यांनी ट्विटरद्वारे दिली. दुसऱ्या टप्प्यामध्ये सल्लागाराद्वारे यामध्ये आलेल्या बोली प्रक्रियेचं मूल्यांकन करण्यात येईल. तुहिन कांत पांडे हे या प्रक्रियेच्या व्यवस्थापनाचं कार्य करत आहेत. तर दुसरीकडे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीदेखील बीपीसीएलमध्ये सामरिक गुंतवणूक सुरू असल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली. अनेक कंपन्यांनी बीपीसीएलमध्ये हिस्सा खरेदी करण्यासाठी रस दाखवला आहे. दरम्यान, या प्रक्रियेमध्ये किती कंपन्यांनी सहभाग घेतला आणि कोणकोणत्या कंपन्या यात सहभागी झाल्या होत्या याची माहिती मात्र देण्यात आल्या नाहीत. दरम्यान, या क्षेत्राशी निगडीत असलेल्या काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रक्रियेत ३ – ४ कंपन्या सहभागी झाल्या होत्या.
रिलायन्स इंडस्ट्रीज या प्रक्रियेतील एक महत्त्वाची कंपनी असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु त्यांनीदेखील यातून माघार घेतली. बीपीसीएल कंपनीचा इंधन व्यवसायात २२ टक्के वाटा असून देशातील सर्वात मोठी रिफायनरीदेखील आहे. दरम्यान, रिलायन्स व्यतिरिक्त सौदी अरेबियातील सर्वात मोठी इंधन कंपनी सौदी अरामकोनंदेखील या प्रक्रियेत रस दाखवला नाही. तर दुसरीकडे ब्रिटनमधील बीपी आणि फ्रान्सच्या टोटल या कंपन्यांचदेखील भारतीय इंधन बाजारात प्रवेश करण्याची इच्छा होती. परंतु त्यांच्याकडूनही या व्यवहारात रस दाखवण्यात आला नाही.