अहमदनगर (वृत्तसंस्था) ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी प्रदेशाध्यक्षांकडे पाठविलेल्या राजीनाम्यात मराठी शुद्धलेखनाच्या अनेक चुका असल्याने तो फेटाळण्यात यावा, अशी भूमिका अनेक नेटकऱ्यांनी मांडल्यामुळे खडसेंचा राजीनाम्याचा विषय सोशल मीडियात एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.
अहमदनगरमधील शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी खडसे यांच्या राजीनामापत्रातील चुका लक्षात आणून दिल्यानंतर सोशल मीडियात एकच चर्चा सुरू झाली. कुलकर्णी यांनी हे राजीनामा पत्र जर इंग्रजीत असते तर फक्त स्पेलिंगच्या चुकांसाठी गाजले असते, पण मराठीत शुद्धलेखन दुर्लक्षित असते. मीही अनेक शब्द चुकतो पण दोन ओळींच्या राजीनामा पत्रात किती चुका असाव्यात? प्रती शब्द प्रति असा हवा, वैयक्तीक शब्द वैयक्तिक असा हवा, प्राथमीक शब्द प्राथमिक हवा, ऑक्टोबरवर टिंब दिलाय तो नको, महसुल शब्द महसूल असा हवा, कृषीमंत्री शब्द कसा लिहावा? विधानसभा हे जोडून हवे, असे म्हटले म्हटले आहे. दरम्यान, दोन ओळीचे राजीनामापत्र जर बिनचूक होत नसेल तर इतरांनी यातून काय बोध घ्यावा? त्यामुळे या चुकांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि वेगळा संदेश देण्यासाठी राजीनामा फेटाळण्यात यावा, असे मतही काही नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे.