चाळीसगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि., चाळीसगाव यांच्या सभासद नोंदणीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.१३) ‘राष्ट्रीय विद्यालय सभासद हक्क अभियान’ अंतर्गत चाळीसगावात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळाली. भर उन्हातही शेकडो नागरिक, महिला तसेच सर्वपक्षीय मान्यवरांच्या उपस्थितीत आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या करगाव रोड येथील मुख्य कार्यालयात सभासद अर्ज जमा करण्यासाठी धडक देण्यात आली.
यावेळी चाळीसगाव, भडगाव, पाचोरा तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी भरलेले २६ हजार २४३ सभासद अर्ज व प्रत्येकी ५०१ रुपयांच्या डिमांड ड्राफ्टसह संस्थेकडे जमा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र संस्थेच्या कार्यालयास कुलूप असल्याने तसेच कर्मचाऱ्यांनी अर्ज स्वीकारण्यास नकार दिल्याने उपस्थित नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.
या घटनेनंतर तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी नितीन पाटील यांनी घटनास्थळी उपस्थित राहून सर्व सभासद अर्जांचा पंचनामा केला. हा अहवाल जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जळगाव यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान संस्थेच्या आवारात आयोजित सभेत बोलताना आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, राष्ट्रीय विद्यालयात संगनमताने गुपचूप सभासद नोंदणी करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर झाली होती. त्यानंतर २६ जानेवारी रोजी सर्वपक्षीय बैठकीत सर्वसामान्य नागरिकांनाही सभासदत्व मिळावे या मागणीसाठी एकमत झाले आणि त्यानंतर सभासद अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले.
या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत चाळीसगाव, भडगाव, पाचोरा तालुक्यासह जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी सभासद होण्यासाठी अर्ज भरले. यामुळे एकप्रकारे लोकचळवळ निर्माण झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ ही बहुजनांची संस्था असून हजारो विद्यार्थी या संस्थेतून घडले आहेत. “ही लढाई कोणत्याही व्यक्ती किंवा संचालक मंडळाविरोधात नसून संस्थेचे मायबाप आम्हीच आहोत अशी धारणा करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात आहे,” असे ते म्हणाले.
संस्थेच्या स्थापनेत स्व. रामराव जिभाऊ पाटील, स्व. मोतीरामभाऊ पाटील, स्व. राजारामभाऊ पाटील, स्व. सोनुसिंह अण्णा पाटील यांसारख्या अनेक विभूतींचे मोठे योगदान असल्याचा उल्लेख करत आमदार चव्हाण यांनी सांगितले की, चाळीसगावसह पाचोरा व भडगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये संस्थेचा विस्तार नागरिकांचे श्रमदान, सभासदांचे कष्ट आणि दानशूर व्यक्तींच्या योगदानातून झाला आहे. अनेक ग्रामपंचायतींनी शाळांसाठी मोफत जमिनी उपलब्ध करून दिल्या आहेत.
स्व. य.ना.चव्हाण, डॉ. विनायक चव्हाण व त्यांचा परिवार तसेच श्री. अरुणबापू निकम आदी मान्यवरांनी संस्थेच्या जडणघडणीत दिलेल्या योगदानाचा आदर असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र सभासद नोंदणीच्या मुद्द्यावर घेतलेल्या भूमिकेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाल्याची टीकाही त्यांनी केली.
सभासद नोंदणीच्या मुद्द्यावर डॉ. चव्हाण यांनी यु-टर्न घेतल्याची टीकाही त्यांनी केली. “आम्ही सभासद केले नाहीत, फक्त चर्चा केली, असे म्हणणे म्हणजे ‘आम्ही चोरी केली नाही, फक्त चोरी कशी करायची याबाबत चर्चा केली’ असे म्हणण्यासारखे आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
तसेच नव्याने मर्जीतील व नातेवाईक असे एकूण २४०० नवीन सभासद नोंदणी साठी दि. १६, १७ आणि १९ जानेवारी २०२६ रोजी संस्थेच्या करंट अकाऊंटमध्ये प्रत्येकी ५०१ प्रमाणे एकूण १२,०२,४०० रुपये जमा झाल्याचे बँक स्टेटमेंट आमदार चव्हाण यांनी जाहीर करत डॉ. विनायक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सभासद नोंदणी झाली नसल्याचा जो दावा केला होता तो खोदून काढला.
तसेच “२५ हजार सभासदांचा व्यवस्थापन खर्च संस्थेला परवडणार नाही,” असा दावा डॉ.विनायक चव्हाण यांनी केला होता यावर आमदार चव्हाण म्हणाले की, राज्यात अनेक संस्था १५ हजारांपेक्षा अधिक सभासदांसह यशस्वीपणे चालत आहेत. उलट एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक सभासद होण्यासाठी उत्सुक आहेत, याचे स्वागत व्हायला हवे होते.
सभेत ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, पत्रकार आर. डी. चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, संस्थेचे संचालक डॉ. संजय देशमुख तसेच भाजपचे प्रदेश पदाधिकारी के. बी. साळुंखे यांनीही आपली भूमिका मांडत सर्वसामान्य नागरिकांना सभासदत्वाचा अधिकार मिळाला पाहिजे, अशी भूमिका व्यक्त केली.
या आंदोलनात संस्थेचे माजी सचिव व विद्यमान संचालक अरुण निकम, धर्मराज वाघ, बाजार समितीचे सभापती प्रदीप पाटील, उपनगराध्यक्ष हर्षल चौधरी, सुधीर पाटील, एम. बी. पाटील यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
■ न्यायालयात जाणार
संस्थेने सभासद अर्ज स्वीकारण्यास नकार दिला असला तरी हा लढा सहकार जिवंत ठेवण्यासाठी असल्याचे सांगत आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, २६ हजार २४३ नागरिकांनी विश्वासाने अर्ज भरून दिले आहेत. १४ मार्चपासून सभासद प्रक्रियेबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. सर्व नागरिकांना सभासदत्व मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.
■ स्व. रामराव जिभाऊ पाटील यांचा पुतळा उभारणार
राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक चेअरमन स्व. रामराव जिभाऊ पाटील यांच्या स्मृती जपण्यासाठी संस्थेच्या आवारात त्यांचा पुतळा उभारण्यात येईल, अशी घोषणाही आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी केली.
■ अधिकाऱ्यांचे म्हणणे
“संस्थेच्या मुख्य कार्यालयात सादर करण्यात आलेल्या **२६ हजार २४३ सभासद अर्जांचा पंचनामा करण्यात आला आहे. हा अहवाल जिल्हा उपनिबंधकांकडे सादर करण्यात येईल. पुढील कार्यवाही त्यांच्या आदेशानुसार केली जाईल.”
— दिपक परदेशी, सहाय्यक निबंधक, चाळीसगाव












