जळगाव (प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपासून ‘टोळी युध्दा’मधील गोळीबाराच्या घटनांमुळे जळगाव जिल्हा हादरला आहे. आता जिल्ह्यातील अवैध शस्त्रांची तस्करी रोखण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून त्यामुळे आता शस्त्र वापरणाऱ्या गुन्हेगारांची खैर नाही, अशी माहिती नाशिक परिक्षेत्राचे डीआयजी डॉ. बी. जी. शेखर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयात शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन डॉ.बी.जी. शेखर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसात झालेल्या गोळीबाराच्या घटनांची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. यापुढे जास्तीत जास्त अग्निशस्त्रे अर्थात गावठी पिस्तूल जप्त करण्यासाठी स्वतंत्र मोहीम राबविली जाणार आहे. या कारवाईचे परिणाम लवकरच दृश्य स्वरूपात दिसतील असेही त्यांनी सांगितले. तसेच गुरुवारी अनेक ठिकाणी पोलिसांनी छापे मारले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मध्यप्रदेशातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी करणार चर्चा
जळगाव जिल्ह्याला लागून असलेल्या मध्यप्रदेशाच्या सीमेवर असलेल्या उमटी या गावातून होणारी अवैध शस्त्रांची तस्करी रोखण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला आहे. तसेच यासाठी बॉर्डर कॉन्फरन्ससह मध्यप्रदेशातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बोलून मदत घेण्यात येईल.
अनुचित घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी ५०० सीसीटीव्ही लावणार
जिल्ह्यात होणाऱ्या अनुचित घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी जळगाव जिल्ह्यात ५०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी डीपीआर तयार करणे सुरू आहे.
पाच वर्षातील शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांचे रेकॉर्ड
गेल्या पाच वर्षातील अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या संशयितांचा डाटा संकलित करण्याचे काम सुरू आहे. हे गुन्हेगार आता कुठे आहेत, याची माहिती घेऊन त्यांच्यावर एमपीडीए व मोका तसेच प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.