मुंबई (वृत्तसंस्था) एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्यासह 39 आमदारांनी बंड पुकारल्याने शिवसेनेत उडालेली खळबळ शांत होत नाही, तोच आता शिंदेंशी जुळवून घ्या, असा १४ खासदारांचा उद्धव ठाकरेंना आग्रह असल्याचे वृत्त समोर आले आहे.
शिंदे यांच्या बंडामुळे पक्षाची पूर्णपणे वाताहात झाल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्याशी जुळवून घ्यावे, असं शिवसेनेच्या खासदारांना वाटत आहे. तशी इच्छाही या खासदारांनी उद्धव ठाकरे यांना बोलून दाखवल्याचं सांगितलं जात आहे. भाजपाच्या एका केंद्रीय नेत्यानं दावा केला की शिवसेनेतील आमदारांच्या बंडाचे परिणाम खासदारांवरही पाहायला मिळतील. शिवसेनेच्या १९ पैकी कमीतकमी डजनभर खासदार वेगळी भूमिका घेण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी संध्याकाळी खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला शिवसेनेचे ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. यावेळी खासदार आणि ज्येष्ठ नेत्यांनी एकनाथ शिंदेंशी जुळवून घेण्याचा सल्ला उद्धव ठाकरे यांना दिला आहे, असं सूत्रांनी सांगितलं. तर शिंदे यांच्या संपर्कात शिवसेनेचे 14 खासदार असल्याचा दावाही करण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेना खासदारांच्या बैठकीत तीन खासदार अनुपस्थित होते. यात एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे, भावना गवळी आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे यांचा समावेश आहे. भावना गवळी सध्या ईडीच्या रडारवर आहेत. शिवसेनेचे लोकसभेत एकूण १९ तर राज्यसभेत तीन खासदार आहेत.