जळगाव (प्रतिनिधी) महापौर जयश्री महाजन व त्यांचे पती सुनील महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची भेट घेतल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान, महापौर जयश्री महाजन आणि पती सुनील महाजन यांचे एकनाथ खडसेंसोबत सद्यस्थितीतील राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
महापौर व त्यांचे पती सुनील महाजन यांचे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळचे संबंध आहेत. महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर जयश्री महाजन या महापौर झाल्या होत्या. शिंदे नगरविकास मंत्री असल्याने महापालिकेसाठी मोठ्या प्रमाणावर निधीही शिंदे यांनी उपलब्ध करून दिला आहे. जळगावच्या महापौर जयश्री महाजन आणि त्यांचे पती महापालिकेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी मुक्ताईनगर येथील निवासस्थानी एकनाथ खडसे यांची भेट घेतली. खडसे यांच्यासोबत सलोख्याचे संबंध आहेत. विधान परिषद निवडणुकीत त्यांचा विजय झाल्याने त्याबद्दल त्यांचं स्वागत आणि सत्कार करण्यासाठी मुक्ताईनगरात आल्याचे स्पष्टीकरण महापौर जयश्री महाजन यांनी दिले आहे.
एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक असून ते वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्याबाबत माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याने बोलणे चुकीचे आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या हितासाठी योग्य तो निर्णय घेतील, अशी भूमिका महापौरांनी व्यक्त केली. तुम्ही एकनाथ शिंदेंसोबत आहात का? अशी विचारणा यावेळी करण्यात आली. आम्ही शिवसैनिक आहोत व शिवसेनेसोबत असल्याचे महापौर जयश्री महाजन यांनी स्पष्ट केले.