जळगाव (प्रतिनिधी) देशभरात दि.३१ जानेवारी रोजी पोलिओ रविवार घेण्यात आला. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत जळगाव शहर मनपाच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते लहान बाळाला पोलिओचे दोन थेंब पाजून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली.
शाहू महाराज रुग्णालयात सकाळी १० वाजता घेण्यात आलेल्या पोलिओ रविवार कार्यक्रमाला महापौर सौ.भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, नगरसेवक कैलास सोनवणे, डॉ.विरेन खडके, महेश चौधरी, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलानी, परिचारिका मारिया आरोले, संगीता पाटील, ज्योत्स्ना वासनिक, श्री.सनेर आदी उपस्थित होते. महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते चिमुकली दिविशा वाणी हिस पोलिओचे दोन थेंब देऊन लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. सर्व मान्यवरांच्या हस्ते बालकांना पोलिओ लस देण्यात आला.
शहरात ६० हजारावर बालकांना देणार लस
पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत शहरातील १ ते ५ वर्ष वयोगटातील ६१ हजार ९८ मुलांना डोस दिले जाणार आहेत. पोलिओ रविवारसाठी संपूर्ण शहरात १९३ बूथ तयार करण्यात आले होते. संपूर्ण बूथवर ५४६ कर्मचारी आणि ३६ पर्यवेक्षकांनी सेवा बजावली. पोलिओ रविवारनंतर शहरात ५ दिवस फिरती मोहीम राबविण्यात येणार असून बालकांना घरोघरी जाऊन लस दिली जाणार आहे. मोहिमेसाठी १७२ पथक तयार करण्यात आले असून प्रत्येक पथकात २ कर्मचारी असणार आहे. शहरात मोहीम यशस्वी करण्यासाठी ३५ पर्यवेक्षक लक्ष ठेवणार आहेत. तसेच रस्त्यावरील मुले, बांधकाम सुरू असलेल्या इमारती, वीट भट्ट्या याठिकाणी राहणाऱ्या बालकांना लस देण्यासाठी मोबाईल टीम, नाईट टीम तयार करण्यात आलेली आहे.