अमरावती (वृत्तसंस्था) पादचारी वृद्धाला दुचाकीचा धक्का लागल्याने उद्भवलेल्या वादात मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही घटना शनिवारी, १ जुलै रोजी मध्यरात्री खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तारखेडा चौकात घडली. मनोज हिरालाल सोनी (30, रा. तारखेडा, अमरावती) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी फैजान खान मुस्ताक खान (२९, रा. पाचक, अमरावती) या आरोपीला अटक केली.
मनोज हा मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होता. शनिवारी मध्यरात्री तो घरापासून काही अंतरावर चौकात रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे नागरिकांना दिसून आले. नागरिक व कुटुंबीयांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरुवात केली.
तपासात या गुन्ह्यात दोन आरोपींची नावे निष्पन्न झाली. त्यातील फैजान खानला पोलिसांनी ताब्यात घेतले. फैजान खान व त्याचा साथीदार हे दुचाकीने तारखेडा परिसरातून जात होते. मार्गात त्यांच्या दुचाकीचा एका पादचारी वृद्धाला धक्का लागला. या कारणावरून पादचारी वृद्ध व त्या दोघांचा वाद झाला. त्यावेळी मनोज सोनी हा वाद सोडवायला गेला. त्यावर फैजान खान व त्याच्या सहकाऱ्याने मनोज सोनी याच्यावर चाकूने वार करून तेथून पळ काढला, असे चौकशीत समोर आले असून पुढील तपास सुरू आहे.