जळगाव (प्रतिनिधी) म्हाडाच्या चार प्रवर्गांतील परीक्षांचे पेपर फोडण्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला अॅड. विजय दर्जीची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. दरम्यान, जैन दर्जीने गुन्हा कबूल केला असल्याचीही माहिती देखील पोलीस सूत्रांनी दिलीय.
टीईटी घोटाळ्यात बीडचा मुख्य संशयित राजेंद्र सानपला अटक केल्यानंतर सानप हा जळगावचा विजय दर्जी याच्या संपर्कात असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी दोघांचे मोबाईलचे सीडीआर काढले असता दर्जी आणि सानप हे एकमेकाच्या संपर्कात असल्याचे फोन रेकॉर्डवरून उघड झाले. त्यामुळे सानपच्या अटकेनंतर पुणे पोलिसांनी दर्जीकडे लक्ष केंद्रित केले होते. काही दिवस सर्व माहिती गोळा केल्यानंतर दर्जीला २५ मे रोजी त्याच्या गोलाणी मार्केटस्थित ऑफिसमधून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर दर्जीला अटक केल्याची माहिती सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिली होती. तर कोर्टात हजर केल्यानंतर दर्जीला १ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानुसार त्याला पुन्हा कोर्टात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झालीय.
पोलीस कोठडी दरम्यान, दर्जीने आपला गुन्हा कबूल केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. तसेच पोलीस चौकशीत दर्जीचा इतर परीक्षा घोटाळ्यात सहभाग असल्याचेही पुरावे पोलिसांना मिळाल्याचे कळते. पुढील काही दिवसात यासंदर्भात आणखी काही मोठी माहिती समोर येणार असल्याचे कळते. दर्जीकडे अनेक विद्यार्थी पैशांसाठी तगादा लावत असल्याचेही समोर आले आहे. तर विजय दर्जीला ताब्यात घेण्यापूर्वी कार्यालयाच्या झाडाझडतीतून दोन म्हाडाचे दोन प्रवेश पत्र जप्त करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पोलीस सूत्रांनी दिली होती. त्याच्याकडून आणखी काही प्रवेश पत्र मिळाल्याचीही माहिती समोर येत आहे. पुणे पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या चौकशीत दर्जी आणि घोटाळ्याचा मुख्य संशयित आरोपी राजेंद्र सानप हे दोघं एकमेकाच्या संपर्कात असल्याचेही समोर आले आहे.
















