मुंबई (वृत्तसंस्था) म्हाडाचा पेपर फुटलाच नाही, पण परीक्षेआधीच गोपनीयेतेचा भंग झाला होता. असे म्हणत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पेपरफुटीवर आपले स्पष्टीकरण दिले.
पेपर फोडण्याआधीच पोलिसांनी पेपरफुटीतील टोळीला पकडलं. आरोग्य विभागाच्या पेपरफुटीतील आरोपींच्या संवादात म्हडाच्या प्रश्नपत्रिकेचा उल्लेख झाला होता. म्हडाच्या अधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्वरित पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हाडाच्या भरतीच्या परीक्षेतेचा पेपर कुठेही फुटला नाही, त्याआधीच कारवाई करण्यात आली. म्हाडाच्या पेपरसंदर्भात फक्त एकाच व्यक्तीला माहिती होती, तरीही पेपर कसा फुटला? म्हाडाच्या परीक्षेआधीच गोपनीयेतेचा भंग झालाय. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आव्हाड म्हणाले.
म्हाडाच्या परीक्षा अचानक रद्द कऱण्यात आल्यामुळे विद्यार्थांना मनस्ताप झाला. सर्व विद्यार्थांची मनापासून माफी मागतोय. विद्यार्थांची परीक्षा फी माफ केली जाणार आहे. त्याशिवाय, पुढील परीक्षेला त्यांच्याकडून कोणतीही फी घेतली जाणार नाही. यापुढे म्हाडा स्वत: प्रश्नपत्रिका तयार करेल, असे आव्हाडांनी सांगितलं.
आज म्हाडासाठी सकाळच्या सत्रात कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता आणि सहायक विधी सल्लागार तर दुपारच्या सत्रात कनिष्ठ अभियंता पदाची होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. ही परीक्षा जानेवारी महिन्यात होईल असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. या परीक्षेसाठी आज सकाळच्या सत्रात ५० हजार उमेदवार तर दुपारच्या सत्रात ५६ हजार उमेदवार परीक्षा देणार होते.
















