जळगाव (प्रतिनिधी) – खासगी क्लास व हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलीचे तयार केलेले आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिचा वेळोवेळी विनयभंग करण्यात आला. ही घटना नोव्हेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान घडली. याप्रकरणी संशयित हुजेफ युनूस पिंजारी (वय १९, रा. धुळे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आले आहे.
धुळे येथील हुजेफ पिंजारी याने जळगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन विद्यार्थिनीचे शहरातील एका खासगी क्लासच्या स्वच्छतागृहात तसेच एका हॉटेलच्या रुममध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केले होते. त्यानंतर तो तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला व नाही म्हटले तर तुझे व्हिडिओ व्हायरल करेल, अशी धमकी देत होता. वारंवार मोबाईलवर सदर विद्यार्थिनीशी संपर्क साधून तिचे व्हिडीओ तयार करून मागविण्यासह विवस्त्र फोटोही मागवत होता.
त्रासाला कंटाळून पोलीसात तक्रार
सततच्या या प्रकाराला कंटाळून पीडितीने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून हुजेफ पिंजारी याच्याविरुद्ध पोक्सो कलमान्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आले आहे.















