मुक्ताईनगर (प्रतिनिधी) शहरातील जुने गावातील नागेश्वर मंदिराकडून जुने कोथळी येथील श्रीक्षेत्र मुक्ताबाई मंदिरात जाताना रस्त्यात असलेल्या पुलाचे श्रेय आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेऊ नये, तसेच त्यांनी स्वतः केलेल्या कामाचेच श्रेय घ्यावे, असे प्रतिपादन जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे – खेवलकर यांनी केले आहे.
नागेश्वर मंदिराकडून जुन्या मुक्ताबाईकडे जाताना रस्त्यात ढासळलेला पूल असून, त्या पुलाचे भूमिपूजन दि. ४ एप्रिल रोजी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावरून जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे- खेवलकर यांनी मुक्ताईनगर संवेदना फाउंडेशनच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.
यावेळी जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे – खेवलकर म्हणाल्या की, आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वतः केलेल्या कामाचेच श्रेय घ्यावे. इतरांनी केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रकार त्यांनी करू नये, असा आरोप त्यांनी केला आहे. श्रेयच घ्यायचे असेल तर आमदारांनी मेळसांगवे- पंचाने- सुलवाडी- ऐनपूर – रावेर हा तापी नदीवरील पूल करून दाखवावा, असे जाहीर आव्हान त्यांनी दिले. जर हा पूल केला तर त्यांचा आम्ही जाहीर सत्कार करू, असे त्यांनी सांगितले.
चांगदेव मंदिर मानेगाव, जुनी कोथळी गजानन महाराज मंदिर मुक्ताईनगर ते राज्य महामार्ग सहा रस्ता प्रजिमा ९१ मध्ये निंबा देवी मंदिराजवळ मोठ्या पुलाची पुनर्बांधणी करण्यासंदर्भात माजी मंत्री एकनाथराव खडसे हे आमदार असतानाच तत्कालिन महसूल, कृषी, मदत, पुनर्वसन व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे या पुलाची पुनर्बांधणी करण्यासंदर्भात मागणी केली होती. या पुलासाठी १५० लाख रुपये मंजूर देखील करण्यात आले आहे. मात्र, पुलासाठी निधी आल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी भूमिपूजन करून श्रेय घेण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. असंही रोहिणी खडसे- खेवलकर म्हणाल्या.
















