जळगाव (प्रतिनिधी) चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी नुकतीच माजी मंत्री तथा शिवसेना उद्धव ठाकरे ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन यांची रविवारी जळगाव येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोघांच्या या भेटीत जळगाव लोकसभा मतदार संघाबाबत महत्वपूर्ण चर्चा झाल्याचे कळते. परंतू चर्चेचा संपूर्ण तपशील अद्याप गुलदस्त्यात असल्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांनी भेट घेतल्यानंतर महायुतीच्या अधिकृत उमेदवार स्मिताताई वाघ यांनी देखील सुरेशदादा जैन यांची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा यांना जळगाव मतदारसंघात उमेदवारी मिळण्याची शक्यता वाढली आहे. संपदा पाटील यांनी मतदारसंघात प्रचारही सुरू केल्याचे वृत्त आहे. याच पार्श्वभूमीवर आधी मंगेश चव्हाण आणि नंतर स्मिताताई वाघ यांनी भेट घेतल्यामुळे या भेटींना वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.
यावेळी मंगेश चव्हाण यांनी सुरेशदादा यांना विठ्ठल- रुख्मिणीची मूर्तीही भेट दिली. तसेच लोकसभा निवडणुकी विषयी सुरेशदादांसोबत चर्चा केली, अशी प्रतिक्रिया आ. चव्हाण यांनी माध्यमांना दिली. परंतू चर्चेचा तपशील गुलदस्त्यात असल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. तर राजकीय जुगाड जमविण्यात माहीर असलेले आमदार मंगेश चव्हाण यांनी भेट घेतली, चर्चा केली एवढ्या पुरता याकडे बघता येणार नाही तर आगामी निवडणुकीपूर्व काळात प्रचंड मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याचे हे द्योतक असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तविला आहे.
















