अमरावती (वृत्तसंस्था) आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना मोठा दिलासा मिळालाय. कारण सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केलाय. मनपा आयुक्तांवर शाईफेक केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. अखेर आज कोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
न्ययालयाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केल्यानंतर रवी राणा यांनी अमरावती पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप केलेत. पोलीस आयुक्तांनी दबावाखाली येऊन माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला, असा आरोप राणा यांनी केलाय. शाईफेकीच्या घटनेवेळी मी दिल्लीत होतो. असं असतानाही माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. त्यामुळे मी आता अमरावती पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणार असल्याचं रवी राणा यांनी सांगितलं. तसंच सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होणार असल्याचं राणा यावेळी म्हणाले.
नेमकं प्रकरण काय?
पालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर हे पालिकेच्या आवारात ९ फेब्रुवारी रोजी दुपारी अधिकारी आणि सुरक्षा रक्षकासोबत कचऱ्याची पाहणी करत होते, त्यावेळी हा प्रकार घडला. ओपन स्पेस असल्याने या ठिकाणी दोन महिला आल्या. त्यांना सुरक्षा रक्षकाने अडवण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात एका महिलेने आपल्या पिशवीतून एक बॉटल काढली. त्यात काही तरी असल्याचं लक्षात आल्याने आष्टीकर सतर्क झाले अन् त्यांनी पळायला सुरुवात केली. आयुक्त एका रिक्षाच्या मागे जात असतानाच एका महिलेने त्यांना घेरले अन् बिसलेरीची बाटली भरून आणलेली शाई आयुक्तांच्या अंगावर ओतली. त्यामुळे सुरक्षा रक्षकाने तेवढ्यात धाव घेऊन आयुक्तांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. या सुरक्षा रक्षकाने आयुक्तांना लहान लेकरासारखं कवटाळून धरत या महिलांपासून त्यांचा बचाव केला. त्यानंतर या महिला धावतच पळून गेल्या. जाताना या महिलांनी जय भवानी, जय शिवाजीचे नारे दिले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता.