मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रमण्णा यांच्या तीन सदस्यीय खंडपीठासमोर आज सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे. दरम्यान, आज सुनावणीअंती शिंदे सरकारचं भवितव्य ठरणार आहे.
एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी व्हीप मोडला म्हणून त्यांच्यावर कारवाई करावी अशी याचिका शिवसेनेकडून न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. शिवसेनेकडून दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर आज सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठापुढे महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे.
महत्वाचं म्हणजे या खंडपीठाच्या निर्णयावरच सध्याच्या सरकारचे भवितव्य अवलंबून असल्याने या सुनावणीकडे राज्यासह देशाचे लक्ष लागलं आहे. शिवसेनेने सुप्रीम कोर्टात नव्या सरकारविरोधात तीन याचिका दाखल केल्या आहेत. राज्यपालांनी शिंदे गटाला सत्ता स्थापन करण्याची दिलेली परवानगी, आमदारांनी मोडलेला व्हीप, विधानसभा अध्यक्षांची निवड आणि बहुमत याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
मागील महिन्यात जूनमध्ये विधान परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षात केलेल्या बंडामुळे राज्यात मोठी राजकीय घडामोड घडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार पायउतार झाले. मात्र त्याआधी शिवसेनेने बंडखोर आमदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी करत अजय चौधरी यांची गटनेते पदी निवड केली. त्याला आव्हान देत शिंदे गटाने शिवसेनेच्या कारवाईच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर शिवसेनेच्यावतीनेही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या होत्या.
या यांचिकांवर होणार सुनावणी
16 आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नोटिशीला शिंदे गटाचं आव्हान, एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापनेचं निमंत्रण देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला शिवसेनेचं आव्हान, विधानसभा अध्यक्ष निवडीची अनुमती देण्याच्या निर्णयाविरोधात कोर्टात याचिका, विश्वासदर्शक ठरावाचे निर्देश देण्याच्या राज्यपाल कोश्यारी यांच्या आदेशालाही शिवसेनेकडून आव्हान, एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेतेपदी कायम ठेवून चौधरींची नियुक्ती रद्द करण्याला आव्हान, एकनाथ शिंदे यांना गटनेते आणि गोगावले यांना प्रतोदपदी निवडीला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेनेचं आव्हान, अशा विविध याचिकांवर सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षखालील तीन सदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. खंडपीठ काय निर्णय देते? आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार का? हे पहाणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.