मुंबई (वृत्तसंस्था) काश्मिरी पंडितांवरील हल्लासत्रावरुन शिवसेनेनं भाजपाला लक्ष्य केलं आहे. हिंदूंना कवच देण्याऐवजी हिंदूंनी पळून जावे यासाठी सरकार भाड्याने ट्रक व बसची सुविधा पुरवत आहे. ३७० कलमही हटवले. पुढे काय वेगळे घडले?,” असंही शिवसेनेनं केंद्र सरकारला लक्ष्य करताना विचारलंय.
काय म्हटलंय सामना अग्रलेखात ?
“भारतीय जनता पक्ष एक अजब रसायन आहे. ही मंडळी एरवी राष्ट्रीय किंवा हिंदुत्वाच्या मुद्दयावर नरडी ताणून बोलत असतात, पण जेव्हा खरोखरच हिंदू संकटात येतो तेव्हा तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प बसलेले दिसतात. कश्मीर खोऱ्यांत हिंदू पंडितांच्या हत्यासत्रावर आणि पलायनावर भाजपा व त्यांचे दिल्लीतील मालक तोंड दाबून बसले आहेत. मोदी सरकारचा आठवा वाढदिवस भाजपावाले देशभरात साजरा करीत आहेत, आठ वर्षांच्या कालखंडास उत्सवी स्वरूप दिले जात आहे. आठ वर्षांत फक्त मोदी सरकारने देशाचे कसे नंदनवन केले याचे दाखले दिले जात आहेत. कश्मीरातील ३७० कलम हटवले, पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केला, दहशतवादाचे कंबरडे मोडले वगैरे वगैरे सांगितले जात आहे, पण हे भजन-कीर्तन सुरू असताना कश्मीर खोऱ्यांत लागलेल्या आगीचे चटके या उत्सवी लोकांना बसू नयेत याचे आश्चर्य वाटते,” असा टोला शिवसेनेनं लगावलाय.
“ज्या सर्जिकल स्ट्राइकचे कौतुक करत आहात, त्या सर्जिकल स्ट्राइकचे भांडवल करत मागची निवडणूक जिंकली, पण आज कश्मीरची स्थिती जास्तच बिघडली आहे आणि तेथे हिंदूंच्या रक्ताचे पाट वाहत आहेत. कश्मिरी पंडित मारले जात आहेत. हिंदूंनी सामुदायिक पलायन सुरू केले आहे. कश्मीरच्या रस्त्यांवर उतरून पंडित मंडळी भाजपाला शिव्याशाप देत आहेत. सत्तेचा आठवा वाढदिवस साजरा करणाऱ्यांनी आता या पंडित मंडळींना देशद्रोही किंवा पाकड्यांचे हस्तक ठरवू नये म्हणजे झाले,” असंही शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून म्हटलंय.
‘‘२४ तासांत आम्हाला सुरक्षित ठिकाणी हलवा नाहीतर कश्मीरात एकही हिंदू उरणार नाही’’ हा पंडितांचा आक्रोश उत्सवी राजाच्या कानावर पोहोचलेला दिसत नाही. सरकारने आता काय करावे? कश्मीर खोऱ्यांत घुसलेल्या पाकड्या दहशतवाद्यांचा बीमोड करण्याऐवजी १७७ पंडित शिक्षकांच्या बदल्या म्हणे सुरक्षित ठिकाणी केल्या. हा तर ‘रोगापेक्षा औषध भयंकर’ असाच प्रकार आहे. अशाने ‘टार्गेट किलिंग’ थांबण्यापेक्षा ‘सामुदायिक’ किलिंगचा मार्ग मोकळा होईल. शिक्षकांच्या हत्या सुरू आहेत म्हणून पंडित शिक्षकांना एकजात एकाच मुख्यालयात आणून सरकारने कोणते शौर्य गाजवले?,” असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केलाय.
“कश्मीरात हाहाकार माजला आहे. सरकारला वाटले, मोदी-शहा नामक जादूची छडी फिरताच कश्मीरातील अतिरेकी पळून जातील, पण उलटेच घडले. हिंदू जनताच कश्मीरमधून पळून जाताना दिसत आहे. मोदी-शहांच्या राज्यात कश्मीरातील हिंदूंना वाली कोण? त्यांचे रक्षण कोणी करायचे? मोदी व त्यांचे लोक ‘उरीः द सर्जिकल स्ट्राइक’, ‘द कश्मीर फाइल्स’, ‘पृथ्वीराज’ अशा सिनेमांच्या प्रसिद्धीतच अडकून पडले आहेत. हे ‘चमचेगिरी’छाप चित्रपट लोकांना दाखवून त्यांची मने भडकवायची, देशात नवा धर्मवाद निर्माण करायचा व मतांचा बाजार जिंकायचा, पण त्यामुळे कश्मीरातील हिंदूंना आधार मिळाला का, तर अजिबात नाही. हिंदूंना कवच देण्याऐवजी हिंदूंनी पळून जावे यासाठी सरकार भाड्याने ट्रक व बसची सुविधा पुरवत आहे. ३७० कलमही हटवले. पुढे काय वेगळे घडले?,” असंही शिवसेनेनं केंद्र सरकारला लक्ष्य करताना विचारलंय.
“सर्जिकल स्ट्राइकचे बॉम्ब नक्की कोठे फुटले तेही रहस्यच आहे. ३७० कलम हटवल्यानंतर कश्मीरात किती लोकांनी जमीन खरेदी केली? आम्ही तर म्हणतो, भाजपा किंवा संघाने त्यांचे दुसरे मुख्यालय कश्मीर खोऱ्यांत हलवल्याशिवाय ‘‘कश्मीर हमारा है’’ यावर शिक्कामोर्तब होणार नाही. कश्मीरातून हिंदूंचे पलायन सुरू असताना एकतरी ‘माय का लाल’ पंडितांच्या मदतीसाठी पुढे आला आहे काय? ज्ञानवापी मशीद, ताजमहालखालचे शिवलिंग शोधणारे, गोवंशहत्येसाठी झुंडबळी घेणारे सर्व नवहिंदुत्ववादी कश्मीरातील हिंदूंच्या हत्या आंधळे, बहिरे बनून पाहत आहेत. अशा वेळी पंडितांच्या समर्थनासाठी पुन्हा महाराष्ट्रातूनच गर्जना झाली आहे,” असं शिवसेनेनं म्हटलंय.
‘‘कश्मिरी पंडितांना महाराष्ट्र आधार देईल, काय हवे ते करेल’’ असा ५६ इंच छातीचा दिलदारपणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवून ‘महाराष्ट्र आधार या भारताचा आणि हिंदूंचा’ हेच सिद्ध केले. कश्मिरी प्रजा तळमळत आहे आणि राजा सत्तेचा आठवा उत्सव साजरा करीत आहे. कश्मीरची भूमी रोज हिंदूंच्या रक्ताने भिजत आहे, आक्रोशाने थरथरत आहे, अतिरेकी मोकाट फिरत आहेत आणि राज्यकर्ते सर्जिकल स्ट्राइकच्या न फुटलेल्या बॉम्बची आठवी दिवाळी साजरी करीत आहेत. रोज मरणाऱ्या कश्मिरी पंडितांच्या रक्षणासाठी काय योजना आहे? महाराष्ट्राने पंडितांच्या आधारासाठी बाहू पसरले आहेत. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची हीच परंपरा आहे,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.