नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सोशल मीडियावर अनेक राजकीय नेते सक्रीय असून भारतीय नेत्यांमध्ये या यादीत पंतप्रधान मोदी सर्वात वर आहेत. ट्विटर या लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर पंतप्रधान मोदी यांच्या फॉलोअर्सची संख्या ७ कोटींवर गेली असून राजकारणात सक्रीय असलेल्या जगातील नेत्यात सुद्धा मोदी आघाडीवर गेले आहेत.
ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता सातत्याने वाढत जात आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटरवर ८८.७ मिलियन म्हणजे ८ कोटी ८७ लाख फॉलोअर्स होते. त्यावेळी जगातील सक्रिय नेत्यांच्या यादीत ते पहिल्या क्रमांकावर होते, त्यानंतर मोदींची क्रमांक लागत होता. त्यावेळी मोदींच्या फॉलोअर्सची संख्या ६४.७ मिलियन म्हणजे ६ कोटी ४७ लाख इतकी होती. आता त्यामध्ये मोठी वाढ झाली असून मोदींच्या फॉलोअर्सची संख्या सात कोटींवर गेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर बंदी आणण्यात आल्याने पंतप्रधान मोदी आता ट्विटरवर सर्वाधिक लोकप्रिय असलेले राजकीय नेते बनले आहेत.
पंतप्रधान मोदी हे गेल्या वर्षी म्हणजे २०२० साली ऑगस्ट ते ऑक्टोबर या दरम्यान ट्विटर, यूट्यूब आणि गुगल सर्चवर ट्रेंडिंग चार्टमध्ये सर्वाधिक वरच्या क्रमांकावर होते. ते केवळ भारतातच नव्हे तर जगभरात सर्वाधिक सर्च केले जाणारे राजकीय नेते आहेत. आताही ट्विटरवर त्यांच्या फॉलोअर्सनी सात कोटींचा टप्पा ओलांडला हे त्याच्या वाढत्या लोकप्रियतेचे संकेत आहेत.
अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचे ट्विटरवर १२ लाख ९८ हजार फॉलोअर्स आहेत पण ओबामा आता राजकारणात सक्रीय नाहीत. सध्याचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचे ट्विटरवर ३ कोटी ९ हजार फॉलोअर्स आहेत. भारतात विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचे ट्विटरवर १ कोटी ९४ लाख तर गृहमंत्री अमित शहा यांचे २ कोटी ६२ लाख फॉलोअर्स आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल याच्या फॉलोअर्सची संख्या २ कोटी २८ लाख आहे.