पुणे (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जूनला देहूत (Dehu) दाखल होणार आहेत. शिळा मंदिर आणि जगद्गुरू संत तुकाराम यांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे फलक शहरभर लावण्यात आले आहेत. परंतु, मोशी येथील फलकावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी आक्षेप घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १४ जून रोजी प्रथमच देहू नगरीत येणार असून पंतप्रधानांच्या हस्ते संतश्रेष्ठ तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर देहू संस्थान प्रशासन जोरदार तयारी करत असताच भाजपने देखील मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु केली आहे. मात्र, स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवरुन आता नवीन वादाला सुरुवात झाली आहे. कारण, भाजपकडून मोदींच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवरती विठ्ठलाच्या फोटोपेक्षा मोदींचा फोटो हा मोठा लावण्यात आल्यामुळे तो विठ्ठल भक्तांचा आणि वारकरी सांप्रदायाचा अपमान असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी ट्विट करत या बॅनरवरती आक्षेप घेतला आहे.
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहलं आहे की, ‘संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचून संत तुकाराम महाराजांनी यावर कळस चढविला. पिं-चिंचवड येथे भाजपाने जाणीवपूर्वक मोदींचा फोटो पांडुरंगापेक्षा मोठा दाखवून संप्रदायाचा अवमान केला आहे.’ असं ट्विट करत त्यांनी या फोटोवर आक्षेप घेतला आहे. शिवाय हे बॅनर काढून टाकावे आणि विटेवरी उभा बा विठ्ठलापेक्षा मोठा कोणी नाही. पिंपरी चिंचवड शहर भाजपाने मोदींना विठ्ठलापेक्षाही मोठे दाखवण्याचे पाप केले आहे. वारकरी संप्रदायाची बदनामी वारकरी संप्रदाय खपवून घेणार नाही. भाजपाने वारकरी संप्रदायाची माफी मागावी अशी मागणी देखील केली आहे.