जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील कोविड-१९ रूग्णांमुळे बेड कमी पडू लागले आहेत. याची दखल घेऊन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याशी चर्चा करून मोहाडी रोडवर पूर्णत्वाकडे आलेल्या महिलांच्या रूग्णालयात अतिरिक्त सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे ऑक्सीजनच्या बेडसह सुमारे ३०० पेशंटला अद्ययावत उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
याबाबत माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढीस लागली असून आता बेडची कमतरता भासू लागली आहे. ऑक्सीजन बेड, व्हेंटीलेटर्स यांच्या अभावामुळे अनेक रूग्णांची गैरसोय होऊ लागली आहे. याची दखल घेऊन आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासोबत चर्चा केली. यात शहरात एकाच ठिकाणी अतिशय उत्तम व्यवस्था उपलब्ध होईल असा कोणताही पर्याय नसल्यामुळे मोहाडी रोडवर उभारण्यात आलेल्या महिलांच्या रूग्णालयात पर्यायी व्यवस्था उभी करण्याचे निर्देश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले.
ना. गुलाबराव पाटील यांनी अलीकडेच या रूग्णालयाची पाहणी करून तेथे कोरोना रूग्णांची व्यवस्था करण्याची तयारी करण्याचे निर्देश दिले होते. तर काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या हॉस्पीटलची पाहणी करून प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानंतर आज पालकमंत्री व जिल्हाधिकार्यांची चर्चा झाल्यानंतर या हॉस्पीटलमध्ये कोविड रूग्णालय सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मोहाडी रोडवर फक्त महिलांसाठी १०० खाटांचे अद्ययावत असे हॉस्पीटल उभारण्याला मंजुरी मिळाली होती. हे काम पूर्णत्वाला आलेले आहे. हे रूग्णालय अतिशय प्रशस्त आणि हवेशीर पध्दतीत उभारण्यात आले असून येथे सुमारे ३०० बेडची अगदी सहजपणे व्यवस्था होऊ शकते. यामुळे आता या हॉस्पीटलमध्ये अतिरिक्त ३०० बेडची व्यवस्था करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ना. गुलाबराव पाटील यांनी हे काम तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर असणार्या रूग्णसंख्येचा ताण कमी होणार असून अतिरिक्त रूग्णांना अतिशय अद्ययावत असे उपचार मिळणार आहेत.