चाळीसगाव (प्रतिनिधी) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष तसेच नामदार गिरीशभाऊ महाजन व निरामय सेवा फाउंडेशनचे संचालक रामेश्वरभाऊ नाईक यांच्या माध्यमातून व आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून चाळीसगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रुग्णांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून जवळपास २ हजाराहून अधिक रुग्णांनी याचा लाभ घेतला. चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान येथे आयोजित या शिबिराचे उद्घाटन आमदार मंगेशदादा चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सदर शिबिराला लाईफ केअर हॉस्पिटल नाशिक व वाडिया हॉस्पिटल मुंबई येथील नामांकित डॉक्टर्स हृदयविकार, जनरल मेडिसीन, ईसीजी तपासणी, किडनी विकार, अस्थिरोग व फिजिओथेरपी, जनरल सर्जरी व मुळव्याध, बालरोग आदी तपासण्या करत आजारांचे निदान केले. यात शस्त्रक्रिया निदान झालेल्या रुग्णांना नाशिक व मुंबई येथे मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. त्यासाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या कार्यालयातून रुग्णांना मदत व मार्गदर्शन केले जाणार आहे.
नंदुरबार येथील कांतालक्ष्मी शाह नेत्र रुग्णालय, येथील डॉक्टरांच्या टीमने शिबिरात डोळ्यांचे विकार असणाऱ्या रुग्णांची तपासणी करत त्यांचे निदान केले, यात जवळपास ३०० रुग्णांवर टप्प्याटप्प्याने मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत, त्यातील पहिल्या टप्प्यातील २५ रुग्ण मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी नंदुरबार येथे रवाना करण्यात आले. यासोबतच राज्य शासनाच्या महालॅब तर्फे देखील ६०० हून अधिक रुग्णांचे रक्ताचे नमुने घेत त्यांची विविध प्रकारची तपासणी करण्यात आली. त्यांच्या रक्ततपासणी चे रिपोर्ट रुग्णांना पोच केले जाणार आहेत.
शिबीर घेऊन गर्दी जमवणे हा उद्देश नसून गेल्या ५ वर्षात चाळीसगाव मतदारसंघातील १२०० हून अधिक रुग्णांना मुंबई व नाशिक आदी ठिकाणी मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत, त्याच अनुभवाच्या बळावर सदर शिबिरात शस्त्रक्रिया निदान झालेल्या रुग्णांवर मोफत उपचार उपलब्ध करून दिले जाणार असल्याची प्रतिक्रिया आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी यावेळी दिली. शिबीर यशस्वीतेसाठी निरामय सेवा फाउंडेशनचे रुग्णसेवक किशोर पाटील यांच्यासह लाईफ केअर हॉस्पिटल चे वैद्यकीय पथक, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, अंत्योदय जनसेवा कार्यालायाचे स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.