अमळनेर (प्रतिनिधी) तहसील कार्यालयासमोरून मोटरसायकल चोरणाऱ्या आरोपीला अमळनेर पोलिसांनी शिरपूर येथून अटक केली असून त्याच्याजवळून तीन मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.
विधानसभा निवडणूक काळात माजी आ. शिरीष चौधरी यांचा उमेदवारी अर्ज भरताना झालेल्या गर्दीचा गैरफायदा घेत शिरपूर येथील संतोष विठ्ठल हटकर (वय ३४) रा. क्रांतीनगर शिरपूर याने एक मोटरसायकल चोरली होती. पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी आजूबाजूचे व शहरातील विविध रस्त्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्यांना आढळून आलेल्या संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी त्यांनी तपासाधिकारी हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे, मिलिंद सोनार, निलेश मोरे, प्रशांत पाटील, उज्वल म्हस्के, विनोद संदानशीव यांच्या पथकाला रवाना केले. संतोष हटकर यांच्याविरुद्ध शिरपूर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल असल्याने तांत्रिक मुद्द्द्यांच्या आधारे त्याची ओळख पटली. पोलिसांनी त्याला त्याच्या घरून अटक केली.
अमळनेर पोलीस स्टेशनला आल्यावर त्याला पोलिसी खाक्या दाखवला असता त्याने अमळनेर येथून चोरलेली मोटरसायकलसह बाहेरगावाहून चोरलेल्या दोन मोटरसायकली काढून दिल्या. पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत. दरम्यान त्याच्याकडून आणखी अनेक चोऱ्या उघडकिस येण्याची शक्यता आहे. अमळनेर शहरातून अनेक मोटरसायकली चोरीस गेल्या आहेत.