पारोळा/मुक्ताईनगर (प्रतिनिधी) गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पारोळा आणि मुक्ताईनगर तालुक्यात घडली आहे. मनोज हिरालाल पाटील (५३, रा. पळासखेडे सीम, ता. पारोळा) आणि फिरोज गव्हाणसिंग पवार (२५, रा. हलखेडा, ता. मुक्ताईनगर) अशी मृतांची नावे आहेत.
सिन फाटा येथील पाझर तलावावर घडली दुर्घटना !
मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथील फिरोज गव्हाणसिंग पवार (वय २५) हा युवक गुरुवारी सांयकाळी आपल्या घरातील श्री गणरायाचे विसर्जन करण्यासाठी सिन फाटा येथील पाझर तलावावर गेला होता. मात्र, या वेळी त्याचा पाण्य तोल गेल्याने तो पाण्यात बुडाला. या वेळी उपस्थितांनी ही माहिती पोलीस पाटील अनेश बनेशबाबू पवार यांना दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याचा पोहणाऱ्यांकडून शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्र झाल्याने सकाळी फिरोज याला शोधण्याचे काम चांगदेव येथील नावाडी संघटनेच्या पोहणाऱ्यांकडुन पुन्हा हाती घेण्यात आले. दरम्यान, दुपारी १२ वाजेच्या सुमारास फिरोज याचा मृतदेह आढळला. याबाबत पोलीस पाटील अनेश पवार यांच्या माहितीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर मृत फिरोज याच्या पश्चात पत्नी व तिन मुले असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.
पाय घसरून पाटचारीत पडला !
पळासखेडे सीम येथे यंदा ‘एक गाव – एक गणपती’ उपक्रम राबविण्यात आला होता. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गावातून वाजत-गाजत गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक पाटचारीजवळ पोहोचली त्यावेळी मनोज पाटील हे पाय घसरून पाटचारीत पडले. तरुणांनी पाटचारीत उड्या मारल्या. परंतु मनोज यांच्या नाका-तोंडात पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे. भाऊसाहेब हिलाल पाटील यांनी खबर दिल्यावरून पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील दोघं गावातील ग्रामस्थांवर श्री गणराया सोबतच दोन जणांना भावपूर्ण निरोप देण्याची वेळ आल्याने गावांवर शोककळा पसरली आहे.