प्रयागराज (वृत्तसंस्था) यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसप्रणीत ‘इंडिया’ आघाडीला सत्ता मिळाली तर देशातील शेतकऱ्यांनी पिकवलेले अन्नधान्य, आलू, ऊस, कापूस व इतर शेतमालाला किमान हमी भाव (एमएसपी) देणारा कायदा करणे व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे वचन राहुल गांधी यांनी यांनी रविवारी दिले. तसेच देशभरातील कोट्यवधी महिलांच्या बँक खात्यात दरमहा ८,५०० रुपये आम्ही जमा करणार, असल्याचे गांधी म्हणाले.
एमएसपी कायद्यासह शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार !
उत्तर प्रदेशातील प्रयागराज लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार उज्ज्वल रमण सिंह यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांनी येथे सभा घेतली. यावेळी ते म्हणाले की, आम्ही गरीब जनतेची यादी तयार केली आहे. त्यांना लखपती बनवण्याचा आमचा संकल्प आहे. प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेचे नाव निवडले जाईल. अशा महिलांच्या बँक खात्यात ‘टकाटक टकाटक’ पणे वार्षिक १ लाख रुपये अर्थात ८,५०० रुपये जमा केले जातील. या सोबतच देशातील शेतकऱ्यांनी पिकवलेले अन्नधान्य, आलू, ऊस, कापूस व इतर शेतमालाला किमान हमी भाव (एमएसपी) देणारा कायदा करणे व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे वचन राहुल गांधी यांनी दिले.
भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघकडून संविधानावर आक्रमण !
भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संविधानावर आक्रमण करीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिलेले संविधान कोणतीही शक्ती फाडू शकत नाही. हे संविधान जनतेचे आहे. आमचा लढा संविधान रक्षणासाठी आहे, असे राहल म्हणाले. ‘इंडिया’ला सत्ता मिळाली. तर आम्ही युवकांना दरवर्षी १ लाख रुपये देणार आहोत. ‘अग्निपथ’ योजना रद्द केली जाईल. मनरेगातील मजुरांना दररोज ४०० रुपये व ‘आशा’ वर्कर्सला दुप्पट वेतन देण्याचे आश्वासन राहुल यांनी दिले. उत्तर प्रदेशातील वाराणसी ही एकमेव जागा भाजप जिंकू शकते. उर्वरित जागांवर ‘इंडिया’ आघाडी बाजी मारेल, असा दावा राहुल यांनी केला. या सभेत बोलताना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले की, यंदाची लोकसभा निवडणूक ही लोकशाही वाचवण्याची आहे. भाजप संविधान बदलणार आहे. पण, आम्ही त्याचे रक्षण करणार आहोत. भाजपने कोरोना प्रतिबंधक लस देऊन लोकांचा जीव घेण्याचे ठरवले आहे.
राहुल-अखिलेश यांच्या सभेत चेंगराचेंगरीची स्थिती !
उत्तर प्रदेशातील फूलपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व सपाध्यक्ष अखिलेश यादव यांच्या संयुक्त प्रचारसभेत रविवारी मोठी गर्दी उसळली. यावेळी कार्यकर्त्यांच्या जमावाने बॅरिकेड्स तोडत सभेच्या व्यासपीठावर जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. तसेच सभास्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे भाषण देण्यापूर्वीच सभा सोडून देण्याची नामुष्की राहुल व अखिलेश यादव यांच्यावर ओढावली. या ठिकाणचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.