मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील कुऱ्हा परिसराला रविवारी सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेदरम्यान बोरांच्या आकाराची गारपीट व अवकाळी पावसाचा तडाखा बसला. त्यात गहू, मका, कांदा, केळी, डाळिंब आदी पिकांचे नुकसान झाले. प्राथमिक अंदाजानुसार तब्बल ५६३ हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहेत.
कुऱ्हा वडोदा, तालखेडा परिसरातील सुमारे २५ ते ३० गावांमध्ये गारपीट व अवकाळी पावसाने नुकसान झाले. प्रामुख्याने कापणीवर आलेला गहू, हरभरा, ज्वारी, टरबूज, डाळिंब, आंबा, वडोदा हळद केळी बागा उद्ध्वस्त झाल्या. ही माहिती मिळाल्यावर सोमवारी आमदार चंद्रकांत पाटील, तहसीलदार श्वेता संचेती, कृषी अधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागात भेटी देत शेतकऱ्यांना धीर दिला. आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दूरध्वनीद्वारे संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती दिली. तसेच नुकसानीचे पंचनामे करण्याची सूचना केली. तालुक्यातील तालखेड, पारंबी, चिंचखेडा खुर्द, सुळे, रिगाव, भोटा आदी गावांना गारपीटीचा तडाखा बसला. तसेच रविवारी सायंकाळी ५ वाजेपासून खंडित झालेला वीजपुरवठा रात्री १० वाजेनंतर सुरळीत झाला.