जळगाव (प्रतिनिधी) ऑक्टोबर 2021 मध्ये मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर ड्रग्जच्या वादग्रस्त छाप्यात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला अटक करण्यात आली होती. अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे (एनसीबी) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी आपल्या खाजगी साक्षीदारामार्फत मध्यस्थी म्हणून केव्ही अर्थात किरण गोसावी याच्यामार्फत टोकन म्हणून अभिनेता शाहरुख खानकडे २५ कोटींची खंडणी मागितली होती. तसेच तडजोडीअंती १८ कोटी रक्कम ठरल्यानंतर आगाऊ रक्कम म्हणून 50 लाख रुपये स्वीकारण्यात आल्याचा आरोप सीबीआयने आपल्या आरोपपत्रात केले आहे. दरम्यान, यातील संशयित आरोपी किरण गोसावीचे जळगाव कनेक्शन समोर आल्यानंतर कधीकाळी प्रचंड खळबळ उडाली होती.
शाहरुख खानकडे 25 कोटीची मागणी !
वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयनं गंभीर आरोप केले आहेत. आर्यन खानची मुक्तता करण्यासाठी वानखेडेंनी शाहरुख खानकडे 25 कोटी रुपये मागितले होते, शेवटी 18 कोटींना डील पक्की झाली होती, असं सीबीआयनं आपल्या एफआयआरमध्ये म्हटलं आहे. वानखेडेंच्या वतीनं किरण गोसावीनं 50 लाखांचं आगाऊ पेमेंटही घेतलं होतं, असाही आरोप सीबीआयनं केला आहे. दरम्यान, किरण गोसावी फरारी असताना त्याने जळगावात मुक्काम केल्याची मोठी चर्चा तो फरारी असतानाच्या काळात रंगली होती. विशेष म्हणजे गोसावीच्या अटकेबाबत तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जळगावचा उल्लेख केल्यामुळं या चर्चेला अधिकच उधाण आले होते. एवढेच नव्हे तर, गोसावी हा मूळचा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील रहिवासी असल्याची चर्चा देखील त्याकाळात रंगली होती.
किरण गोसावीला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक !
आर्यन खान प्रकरणात चर्चेत आलेल्या किरण गोसावी याला ऑक्टोंबर २०२१ मध्ये नोकरीचे आमिष दाखवून एकाची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी पहाटे तीन वाजता पुण्यातील लॅाजमधून अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात पुण्यात चिन्मय देशमुख यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. मलेशिया येथे नोकरीचे आमिष दाखवून देशमुख यांची गोसावीने फसवणूक केली होती. याबाबत पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली होती. पत्रकार परिषदेत गुप्ता म्हणाले होते की, किरण गोसावी यांच्याविरोधात २०१८ मध्ये पुण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून त्याला शोध पुणे पोलिस घेत होती. त्याला फरारी म्हणून घोषित करण्यात आले होते. मागील दहा दिवसापासून किरण गोसावीला शोधण्यासाठी पनवेल, जळगाव, लोणावळा, लखनो येथे पुणे पोलिसांचे पथक गेले होते.
गोसावीचा जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी मुक्काम ?
दरम्यान, गोसावी कुठे आणि कसा कसा फिरला? याबाबत माहिती द्या असा प्रश्न विचारल्यावर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आपण क्रोनोलॉजी समजून घ्या असं म्हणत गोसावी बऱ्याच ठिकाणी गेल्या 10 दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी तो फिरत होता. यामध्ये लखनऊ, फतेहपूर, तेलंगणा, जबलपूर, जळगाव, मुंबई, पनवेल, लोणावळा या ठिकाणांचा समावेश असल्याचे सांगितले होते. या सर्व ठिकाणी पुणे पोलिसांच्या टीम गेल्या होत्या. गोसावी पळत होता तेव्हा तो सचिन पाटील या नावाने सर्वत्र जात होता. याच नावाने तो हॉटेलमध्ये राहत होता. तसेच आपण स्टॉप क्राईम एन्जीओचा प्रतिनिधी असल्याचंही तो सांगत होता. ही प्राथमिक माहिती मिळाली आहे आम्ही याची खातरजमा आणि चौकशी करत आहोत असंही पोलिसांनी सांगितलं.
दरम्यान, गोसावी हा चाळीसगाव तालुक्यातील पिलखेड येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती त्यावेळी समोर आली होती. एवढेच नव्हे तर गोसावीने जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव आणि अमळनेर येथे मुक्काम केल्याची देखील चर्चा त्यावेळी रंगली होती. दुसरीकडे गोसावी जर जळगाव जिल्ह्यात आला होता तर तो नेमका कोणाच्या संपर्कात होता? याबाबतचे प्रश्नचिन्ह आजही कायम आहेत. सीबीआयच्या चौकशीत कदाचित या प्रश्नांची उत्तरं मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
सीबीआयने नेमकी काय कारवाई केली?
भारतीय महसूल सेवा (आयआरएस) अधिकारी समीर वानखेडे आणि अन्य चौघांविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने(सीबीआय) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याच्या अटकेच्या वेळी २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एनसीबीचे तत्कालिन विभागीय संचालक समीर वानखेडे, एनसीबीचे तत्कालिन अधिक्षक विश्व विजय सिंह, तत्कालिन गुप्तवार्ता अधिकारी आशिष रंजन यांच्यासह खासगी व्यक्ती के. पी. गोसावी, सॅन्विल डिसोझा व इतर अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एनसीबीच्या चौकशीच्या आधारावर याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा व भादंवि कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई, दिल्ली, रांची, लखनौ, चेन्नई, गुवाहाटी आणि कानपूरमध्ये २९ ठिकाणी सीबीआयने शोध मोहीम राबविली. त्यात महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
सीबीआयने आरोप पत्रात नेमकं काय म्हटलंय ?
समीर वानखेडेने शाहरुख खानकडे 25 कोटी रुपयांची लाच मागितली होती. नंतर हा सौदा 18 कोटींवर ठरला होता. त्यामध्ये 50 लाखांचे टोकन दिल्याचे सीबीआयने आरोपपत्रात म्हटले आहे. आर्यन खान ड्रग्ज क्रूझ प्रकरणात सीबीआयकडून चौकशी सुरू असलेले अधिकारी समीर वानखेडे यांनी केपी गोसावी आणि प्रभाकर साईल यांना स्वतंत्र साक्षीदार म्हणून घेण्याचे निर्देश दिले होते. एफआयआरनुसार, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) विशेष चौकशी पथकाने (एसईटी) केलेल्या चौकशीत असे समोर आले आहे की, आरोपींना (आर्यन खानसह) स्वतंत्र साक्षीदार के. पी. गोसावी याच्या खासगी वाहनातून एनसीबी कार्यालयात आणण्यात आले होते. आरोपींच्या भोवती स्वतंत्र साक्षीदार केपी गोसावीची उपस्थिती जाणूनबुजून अशा प्रकारे तयार करण्यात आली होती की आरोपींना ताब्यात ठेवण्यासाठी एनसीबी कर्मचारी असतानाही केपी गोसावी हे एनसीबीचे कर्मचारी वाटावे. स्वतंत्र साक्षीदार के. पी. गोसावी याला आरोपींच्या सहवासात हजर राहण्याची परवानगी देण्यात आली होती. तसेच त्याला छाप्यानंतर एनसीबी कार्यालयात येण्याची परवानगी देखील देण्यात आली होती, जी स्वतंत्र साक्षीदाराच्या नियमांच्या विरुद्ध आहे.
















