बीड (वृत्तसंस्था) बीड जिल्ह्याच्या परळी येथील आयोजित विठ्ठल रुक्मिणी मंदिर जिर्णोद्धार कार्यक्रमात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे तर बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी एकाच मंचावर उपस्थिती लावली. यावेळी दोघांनीही एकमेकांवर टोलेबाजी करण्याची संधी सोडली नाही. दरम्यान, दोघेही एकाच व्यासपीठावर दिसून आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या.
परळी शहरात स्वर्गीय मनोहरपंत बडवे सभागृह लोकार्पण सोहळा तसेच विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन काल करण्यात आले होते. यावेळी धनंजय मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी यावेळी हजेरी लावली, या दृश्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतले होते. प्रीतम मुंडे आणि धनंजय मुंडे हे शेजारी बसले असले तरी, या दोघांमध्ये कोणताही संवाद झाला नाही. परंतु या प्रसंगाने चांगलीच चर्चा घडवून आणली.
दरम्यान या कार्यक्रमात दोघा मुंडे बंधू-भगिनीची भाषणातून एकमेकांवर टोलेबाजी दिसून आली. प्रीतम मुंडे यांना या कार्यक्रमाला पोहोचण्यास उशीर झाला. त्यावेळी परळीच्या शहरांतर्गत रस्त्यांची दुरावस्था सांगत खासदार मुंडे यांनी अप्रत्यक्षरीत्या शहरात संथगतीने सुरू असलेल्या कामाबद्दल टीका केली. तर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील खासदार प्रीतम मुंडे यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले. परळीचा पायाभूत विकास सुरु आहे, त्यामुळे आमच्या ताईला इथे पोहोचण्यास उशीर झाला, असं धनंजय मुंडे म्हणाले.
















