जळगाव (प्रतिनिधी) काल रात्री मयुर कॉलनी – पिंप्राळा परिसरात दिराने आपल्या वाहिनीच्या डोक्यात कु-हाडीने वार करून तिची हत्या केल्याची घटना घडली होती. या महिलेचा खून झालेल्या गुन्ह्यात पिंप्राळ्यातील तलाठ्यासह तिची सासू व अन्य नातेवाईकांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आज मयत महिलेच्या माहेरच्या मंडळीने केली आहे.
आज सकाळी मृत योगिताच्या आई व बहिणीसह अन्य आप्तांनी जिल्हा रूग्णालयाच्या आवारात आक्रमक पवित्रा घेत इतरांवरही कारवाईची मागणी केली. त्या म्हणाल्या की, योगिता हिच्या पतीचे चार महिन्यांपूर्वी अपघाती निधन झाल्यानंतर तिच्या सासरच्या मंडळीने तिला व मुलाला त्रास देण्यास सुरूवात केली. योगिताने दुसरा विवाह करून घ्यावा यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आला. तसेच तिच्याकडे असणारे दहा ताळे सोने देखील गायब करण्यात आले. योगिताच्या पतीच्या नावावर असणारे घर व अन्य मालमत्तेवर पिंप्राळ्याच्या तलाठ्याला हाताशी धरून सासू व दिराची नावे लावण्यात आली. यामुळे प्रॉपर्टी हडप करण्यासाठी योगिताचा खून करण्यात आला असून यासाठी पिंप्राळ्याचे तलाठी देखील जबाबदार असल्याने त्याला देखील यात आरोपी करावे अशी मागणी माहेरच्या मंडळीने केली. पोलीस प्रशासन ही मागणी मान्य करत नाही तोवर मयत योगिताचा मृतदेह न स्वीकारण्याचा पवित्रा देखील त्यांनी घेतला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, योगिता मुकेश सोनार (वय ३९) असे मयत विवाहितेचे नाव असून दिपक लोटन सोनार (वय ३८) असे हल्ला करणा-या संशयिताचे नाव आहे. मयत योगिता सोनार यांच्या पतीचे काही महिन्यापुर्वी अपघाती निधन झाले होते. घरातील नेहमीच्या वादातून हा जिवघेणा हल्ला झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून त्याला रामानंद नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.