जळगाव (प्रतिनिधी) १८ फेब्रुवारी रोजी पाचोरा येथे मुस्लिम समाजातील पटेल, देशमुख, देशपांडे बिरादारीच्या गुणवंत विद्यार्थी व कर्तुत्ववान व्यक्तिंचा सन्मान सोहळा संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भालचंद्र मुणगेकर, माजी खासदार तथा मुंबई विद्यापीठ माजी कुलगुरू यांनी दूरध्वनी द्वारे उपस्थितांना संबोधित केले.
मुस्लिम पटेल देशमुख देशपांडे समाजातील विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात अतिशय उत्तम प्रगती करत आहे. याबाबत त्यांनी कौतुक केले. देशाच्या विकासात मुस्लिम समाजाचे योगदान या विषयावर त्यांनी विस्तृत माहिती दिली. सौ. ऐनुल अत्तार, माजी सहसचिव अल्पसंख्यांक विकास विभाग, महाराष्ट्र राज्य यांनी अल्पसंख्यांक समाजासाठी शासनाच्या विविध योजना विस्तृतपणे विषद केल्या व विद्यार्थ्यांनी अड़चणींवर मात करत पुढे येण्याचे मार्गदर्शन केले.
दरम्यान शिवजयंतीचे औचित्य साधुन एक सामाजिक सौहार्दाचा संदेश जावा व पुढील पिढ्यांना छत्रपतींची खरी प्रतिमा कळावी या हेतुने प्रत्येक सत्कारार्थीला व प्रमुख मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना प्रेम हनवते लिखित शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम सैनिक या पुस्तकाचा गाज़ीउद्दीन रिसर्च सेंटर, सोलापुरतर्फे सय्यद शाह वायेज़ यांनी उर्दूत केलेले भाषांतर छत्रपति शिवाजी महाराज के मुस्लिम सिपेसालार या पुस्तकाच्या प्रति देण्यात आल्या. या उपक्रमाचे अनेक मान्यवरांनी कौतुक केले आहे. पुस्तकांसाठीचा सर्व खर्च जळगाव येथील इंजीनियर बाक़ीद देशमुख यांनी केला. पीएचडी धारक, उच्च श्रेणी गुण प्राप्त, सुवर्णपदक प्राप्त, परदेशात शिक्षण घेणारे, एम डी, एम एस, एम बी बी एस असे एकूण ५० विद्यार्थी-विद्यार्थिनीचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष औरंगाबाद येथील जालना जिल्हा परिषदेचे निवृत्त अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख होते. तर प्रमुख पाहुण्यात जालना जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, जळगाव जिल्हा रा. कॉ. पार्टीचे जिल्हा प्रवक्ता खलिल देशमुख, नाचनखेड़ेचे माजी सरपंच हाजी नुरमोहम्मद पटेल, मनसेचे जिल्हा सचिव ऍड जमील देशपांडे, पाचोरा येथील मौलाना मुख्तार पटेल हे उपस्थित होते. कार्यक्रमाला मराठवाडा, खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र व इतर राज्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रस्तावना अ. रशीद देशमुख (बाबूजी) पाचोरा यांनी केली. मौलाना मुख्तार व मुलिंचा मदरसाचे सहकारी यांनी विशेष सहकार्य या कार्यक्रमास लाभले. सूत्र संचालन इमरान देशमुख,अलफ़ैज़ पटेल यांनी केले.
गुणवंत विद्यार्थी गौरव समितीचे जळगाव येथील इंजि. बाकिद देशमुख, आरिफ देशमुख, शकील देशपांडे, इंजी. राजू पटेल, डॉ. सज्जाद पटेल, मुशीर देशमुख, अशफ़ाक़ देशपांडे, मतीन पटेल, ज़की पटेल, वसीम पटेल, फ़हीम पटेल, तसेच पाचोरा येथील हारून देशमुख, डॉ. आलम देशमुख, हैदर देशमुख आदींनी परिश्रम घेतले.