अमळनेर (प्रतिनिधी) सप्टेंबर २०२० मध्ये आणि सध्या सुरु असलेले माझे कुटूंब माझी जबाबदारी या कामाचा मोबदला अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने तत्काळ अदा करावा, अशी मागणी रामकृष्ण पाटील यांनी जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद यांना निवेदाद्वारे केली आहे.
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सप्टेंबर २०२० मध्ये राज्यात माझे कुटूंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात आली. त्यासाठी गावपातळीवर पथकं तयार करून घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करण्यात आले. या पथकात आशा स्वयंसेविका किंवा आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि प्राथमिक शिक्षक यांचा समावेश होता. माझे कुटूंब माझी जबाबदारी ह्या कामाचा मोबदला दिला जाईल असे जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी संघटनेला आश्वासन दिले होते. आरोग्य विभागातर्फे आशा स्वयंसेविका यांना सदर कामाचा मोबदला अदा करण्यात आला. परंतु अंगणवाडी सेविकांना वेळोवेळी प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर करूनही आजतागायत सदर मोबदला अदा केला नाही. असा भेदभाव प्रशासनाने केल्यामुळे त्यांच्यात प्रचंड नाराजी पसरली आहे. असे असतानाही कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये. म्हणून पुन्हा अंगणवाडी सेविकांना माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेचे काम सक्तीने सोपविण्यात आले आहे. मुळातच त्यांचेवर योजनेच्या कामाचा बोजा आहे. सप्टेंबर २०२० मध्ये आणि सध्या सुरु असलेले माझे कुटूंब माझी जबाबदारी या कामाचा मोबदला अंगणवाडी सेविकांना जिल्हा प्रशासनाने तत्काळ अदा करावा अन्यथा कोणतीही पूर्व सूचना न देता सदर कामावर अंगणवाडी कर्मचारी बहिष्कार टाकतील आणि आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करतील तसेच होणाऱ्या परिणामांस जिल्हा प्रशासन जबाबदार राहील. असा इशारा देत मागणी वजा निवेदन जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद यांना पुन्हा दि.२६ मार्च २०२१ रोजी ईमेलद्वारे पाठविले असल्याचे संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी. पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.