चोपडा (प्रतिनिधी) रावेर लोकसभा मतदार संघासाठी शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. मात्र मतदानासाठी केंद्रावर आलेल्या अनेक मतदारांची यादीतील नावेच गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी त्यांची नावे शोधण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र ती नावे सापडली नाहीत. त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क बजावता न आल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तर अनेक मतदारांनी अगदी निवडणूक निर्णय अधिकारी,तहसीलदार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकले नाही. वेळोदे,हिंगोणा, तसेच अनेर काठावरील अनेक गावांमध्ये ही समस्या आली.
एका- एका गावाचे किमान २०ते २५ नावे गायब असल्याचे आढळून आले. तसेच अनेक कुटुंब एकत्रित मतदान करण्यासाठी केंद्रावर येत होते. मात्र पतीचे नाव एका केंद्रात, पत्नीचे दुसऱ्या तर मुलाचे तिसऱ्या केंद्रात आढळून आल्याने त्यांना एकत्रीत मतदान करता आले नाही. ऐनवेळी त्यांना दुसऱ्या केंद्रावर जावे लागले. केंद्र दुर असल्याने अनेक मतदारानी मतदान न करताच पुन्हा घर गाठले. मतदान केंद्र व परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामुळे मतदान शांततेत पार पडले. पोलीसांनी प्रतिनिधींनाही केंद्र परिसरात थांबू दिले नाही. केवळ मतदार मतदान केंद्रात मतदानासाठी जात होते.मतदार सकाळीच मतदानासाठी बाहेर पडल्याने मतदार केंद्रात रांगा दिसून आल्या.
एकीकडे मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाने अथक परिश्रम घेतले. मात्र दुसरीकडे मतदानापासून वंचित राहिलेल्या मतदारांचा संताप अनावर होत होते. प्रसाशानाकडुन याबाबतीत लक्ष दिले गेले असते तर नक्कीच एक दोन टक्के मतदानाचा आकडा वाढला असता इतके निश्चित……!